वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीत बावीस कोटी जळून खाक! जिल्ह्यातील अकरा अग्निशमन बंबाद्वारे अठरा तासांपासून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या ज्वाळा अद्यापही शांत झालेल्या नाहीत. गेल्या अठरा तासांपासून उत्तर नगर जिल्ह्यातील अकरा अग्निशमन बंबाद्वारे सदरची आग नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या आगीत गोदामात साठवून ठेवलेल्या 22 लाख 38 हजार किलो कापसासह 5 लाख 46 हजार 250 किलो अन्नधान्य व गोदाम असा एकूण 21 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. सदरची आग कशाने लागली याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता नाही. मात्र गोदामात ठेवलेल्या संपूर्ण अन्नधान्य व कापसाचा विमा उतरविलेला असल्याने झालेले नुकसान भरुन येणार आहे. मात्र या घटनेतून संगमनेरच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या वखार महामंडळाच्या संगमनेरच्या बाजार समितीच्या आवारातील गोदामाला प्रचंड मोठी आग लागली. आसपासच्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी संगमनेर नगरपालिका व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना दूरध्वनीवरुन याबाबत माहिती दिली. या दोन्ही बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास काहीसा विलंब झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यातच सदरच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवलेला असल्याने आग लागल्यानंतर काही वेळातच तिने रौद्ररुप धारण केले. सुरुवातीला या दोन्ही संस्थांच्या चार बंबांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न तोकडे पडू लागल्याने मालपाणी उद्योग समूहाच्या टँकरसह अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्यासह लोणी येथील प्रवरा कारखाना व राहाता, शिर्डी, सिन्नर, श्रीरामपूर व कोपरगाव येथील अग्निशमन बंबांनाही रात्री उशीराने संगमनेरात पाचारण करण्यात आले.

त्यातच या गोदामांना मुख्य प्रवेशद्वार सोडून अन्य द्वार व खिडक्या नसल्याने अखेर प्रशासनाने रात्री जेसीबी यंत्राचा वापर करुन गोदामाच्या भिंती फोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोदामात साठवलेल्या कापसासारख्या धुमसणार्‍या वस्तुला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले. या अकरा बंबांद्वारा मंगळवारी रात्री आठ वाजेपासून शर्थीचे प्रयत्न सुरु असून आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंतही सदरची आग पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही. संगमनेरातील वरीष्ठ अधिकारी रात्रीपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तळ ठोकून बसले आहेत. गोदामात साठवून ठेवलेल्या वस्तुंचेही मोजमाप व नुकसानीचा अंदाज लावला जात आहे.

दैनिक नायकला प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर गोदामामध्ये प्रत्येकी 170 किलो वजनाच्या कापसाच्या 13 हजार 165 गाड्या (मूल्य 17 कोटी 37 लाख), नाफेडने हमीभावानुसार खरेदी केलेला 2 कोटी 13 लाख रुपये मूल्याचा 4 लाख 41 हजार 150 किलो चना, पाच लाख रुपये मूल्याची 12 हजार 500 किलो मिरी, दोन लाख रुपये मूल्याचे 12 हजार 10 किलो सोयाबिन, सात लाख रुपये मूल्याची 70 हजार किलो बाजरी आणि 10 हजार 500 किलो गहू असा एकूण 19 कोटी 96 लाख रुपयांचा अन्नधान्य व कापसाचा साठा आणि 2 कोटी रुपयांचे गोदाम असा एकूण 21 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. गोदामासह त्यात ठेवलेल्या संपूर्ण शेतमालाचा संपूर्ण विमा असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *