कोविड रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी उपचार करणार्‍या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल! संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी छापा घालून केली होती मुन्नाभाईची पोलखोल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे कोविडच्या वाढत्या संक्रमणाचा फायदा घेऊन अनेक ठिकाणांची रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या बातम्या धडकत असताना, आता बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर ‘धंदा’ मांडून बसलेल्या मुन्नाभाईंंचीही मोठी चलती असल्याचे समोर आले आहे. हे सिद्ध करणारा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथून मंगळवारी समोर आला आहे. येथील एका मुन्नाभाईने चक्क ’कोविड’ रुग्णांवरच अ‍ॅलोपॅथी पद्धतीने उपचार सुरू केले होते. तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणार्‍या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांनी या मुन्नाभाईच्या क्लिनिकवर छापा घातला. रात्री उशीराने तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांसह तालुका पोलिसांच्या पथकाने तेथे छापा घातला, मात्र मुन्नाभाई पसार होण्यात यशस्वी ठरला. या प्रकरणी संबंधितावर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हे दोन्ही वरीष्ठ अधिकारी मंगळवारी तालुक्यातील आरोग्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौर्‍यावर होते. यादरम्यान त्यांनी ठिकठिकाणच्या विलगीकरण केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणीही केली. याच दरम्यान त्यांचा ताफा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण समोर येत असलेल्या निमगाव भोजापूर या गावात पोहोचला. तेथील परिस्थितीची व व्यवस्थेची माहिती घेण्याचे काम सुरू असतानाच गावातील शैलेश किसन कडलग या नावाचा कोणी डॉक्टर कोविड रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती त्यांना समजली.

गावात आलोच आहोत तर सदरचे क्लिनिकही पाहू असा विचार करून अधिकार्‍यांनी सदर ठिकाणी भेट दिली. यावेळी संबंधित डॉक्टरच्या बोलण्यावरून स्वतः डॉक्टर असलेल्या प्रांताधिकारी मंगरुळे यांना संशय आल्याने त्यांनी त्या रुग्णालयाच्या परवान्यासह डॉक्टरच्या शिक्षणाची प्रमाणपत्रे विचारली. त्यातून जे सत्य समोर आले ते पाहून अधिकारीही चक्रावले. संबंधित इसम कोणतीही वैद्यकीय पदवी धारण न करता चक्क अ‍ॅलोपॅथीचा वापर करुन कोविड रुग्णांवर उपचार करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली. आता आपलं काही खरं नाही असं लक्षात येताच संबंधित मुन्नाभाईने तेथून जी धूम ठोकली ती अधिकारी जाईपर्यंत..

याबाबत मंगळवारी सायंकाळी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना सदर बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकासह मंगळवारी रात्री उशीरा निमगाव भोजापूरमधील ‘त्या’ क्लिनिकवर छापा घातला. मात्र पथक येण्यापूर्वीच संबंधित मुन्नाभाई तेथून पसार झाला. यावेळी पथकाने केलेल्या तपासणीत शैलेश किसन कडलग यांच्या क्लिनिकमधून अ‍ॅलोपॅथी औषधांचा गोळ्यांची पाकीटे, इंजेक्शन व अन्य साहित्य मिळून 45 हजार 189 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस त्याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.काँ.एस.एस.पाटोळे यांच्याकडे देण्यात आला आहे.


तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेवून कारवाई करण्याची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे असते. मात्र त्यांच्याकडून वरीष्ठांनी सूचना देवूनही कारवाईत होत नसल्याने या दोन्ही अधिकार्‍यांच्या भूमिका नेहमीच संशयीत राहिल्या आहेत. त्यातच निमगाव भोजापूर ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येते तेथील आरोग्य अधिकार्‍यांनी यापूर्वीच आपल्या भागात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारा कोणीच नसल्याचे लेखी दिल्याचे समजते. त्यानंतरही तेथे चक्क कोविड बाधितांवर अ‍ॅलोपॅथी उपचार करणारा मुन्नाभाई आढळल्याने ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवरही कारवाई होणार का? असा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *