कोविड निर्बंधांमुळे शिर्डीतील श्रीरामनवमी साधेपणाने साईभक्तांनी घेतला ऑनलाईन सोहळा व दर्शनाचा लाभ

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीतील साईसमाधी मंदिर कोविड निर्बंधांमुळे बंद असल्याने यंदाचा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेला रामनवमी उत्सव कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात अत्यंत मोजक्याच अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पहिला दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी साई भक्तांनी लाईव्ह दर्शनाचा व उत्सव सोहळ्याचा लाभ घेतला.

शिर्डीच्या साईसमाधी मंदिरात श्रीरामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी श्री साईबाबांच्या छबीची व श्री साईसच्चरित पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वीणा, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी ग्रंथ (पोथी) व प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले व वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, वैशाली ठाकरे व मंदिर पुजारी उपस्थित होते. श्रीरामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी सपत्नीक समाधी मंदिरात पाद्यपूजा केली. श्रीरामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये वैद्यकीय संचालक डॉ.प्रीतम वडगावे यांनी पहिला, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल्ल पोरवाल यांनी दुसरा अध्याय, बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनकर देसाई यांनी तृतीय, वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम तांबे यांनी चौथा व वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका गाडेकर यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवास मोठे महत्व असते. या उत्सवासाठी जगभरातून भाविक येत असतात. यात्रेनिमित्त याठिकाणी विविध दुकाने येत असतात. मनोरंजनासाठी रहाट पाळणे, जादूचे खेळ, मौत का कुआ असे नानाविविध प्रकार येत असतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट जगभर पसरले आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून श्रीरामनवमी उत्सव शिर्डीमध्ये झाला नाही. कोविडमुळे शिर्डीत भाविक येत नाही. त्यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला मोठी झळ पोहोचलेली आहे. किमान पुढील वर्षी तरी प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव शिर्डीत उत्साहाने साजरी व्हावा, यासाठी भाविक साकडे घालत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *