व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून कोरोनाच्या आपत्तीचे रूपांतर इष्टापत्तीत ः तोमर राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ व्हर्च्युअल क्लासरूम मिळालेले एकमेव विद्यापीठ

नायक वृत्तसेवा, राहुरी
‘व्हर्च्युअल क्लासरूम व अ‍ॅग्रीदीक्षा वेब एज्युकेशन चॅनेल’मुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. देशातील व परदेशांतील कृषी शास्त्रज्ञ व प्राध्यापकांचे व्याख्यान देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून कोरोनाच्या आपत्तीचे रूपांतर आपण इष्टापत्तीत केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद व जागतिक बँक अर्थसाहाय्यीत राष्ट्रीय उच्चशिक्षण प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने देशातील एकूण 18 कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी अनुसंधान अंतर्गत संस्थांना व्हर्च्युअल क्लासरूम देण्यात आल्या. या उपक्रमाचे तोमर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ.त्रिलोचन महापात्र, सचिव संजयकुमार सिंह, उपमहासंचालक (शिक्षण) डॉ.आर.सी.अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, राष्ट्रीय उच्चशिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.प्रभात कुमार, डॉ.राजेंद्र प्रसाद, अधिष्ठाता डॉ.अशोक फरांदे ऑनलाईन उपस्थित होते.

पुढे बोलताना कृषीमंत्री तोमर म्हणाले, कृषी पदवीधरांनी कृषी उद्योजक व्हावे. कृषी ज्ञानाचा शेतकर्‍यांमध्ये प्रसार करून नवनवीन संशोधन करावे. रूपाला म्हणाले, कोविड-19 परिस्थितीतही ऑनलाईन प्रणालीमुळे शिक्षण थांबलेले नाही. आजचे विद्यार्थी भाग्यवान आहेत. त्यांना अद्ययावत ऑनलाईन शिक्षणप्रणालीतून शिक्षण मिळत आहे. या प्रणालीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. डॉ.महापात्र, डॉ.अग्रवाल यांनी क्लासरूमसंबंधी माहिती दिली.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ व्हर्च्युअल क्लासरूम मिळालेले एकमेव विद्यापीठ आहे. व्हर्च्युअल क्लासरूमवर जी व्याख्याने होतील, ती एकाच वेळी वेबकास्ट करून देशातील सर्व ठिकाणी पाहणे शक्य होणार आहे. झालेली व्याख्याने अ‍ॅग्रीदीक्षा वेब एज्युकेशन चॅनेलवर कधीही पाहता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *