खासदार विखेंनी शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये उभारली गुढी जेवणही वाढले; नियमांचे पालन व निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सर्वत्र साधेपणाने साजरा केला जात असताना नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी मात्र थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन तेथील रुग्णांसोबत सण साजरा केला. शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांनी गुढी उभारली तसेच तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणही वाढले. कोरोनामुळे घरापासून दूर राहून उपचार घेणार्‍या रुग्णांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे यांनी सांगितले.

खासदार विखे-पाटील यांनी शिर्डीतील कोविड रुग्णालयास भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी पीपीई कीट घालून डॉक्टर व अन्य अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. उपचार घेणार्‍या रुग्णांना विखे यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मनावर या संकटाची भीती कायम आहे. पारंपरिक सण असूनही कुटुंबियांसमवेत साजरा करता येवू शकत नाही. त्यांचे हे दु:ख हलके करण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे यांनी सांगितले.

या संकटला घालविण्यासाठी उपाय योजनांबरोबरच नियमांचे पालन आणि निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प यानिमित्ताने सर्व अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी केला. शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधिकारी डॉ.मैथिली पितांबरे, डॉ.गोकुळ घोगरे, डॉ.संजय गायकवाड, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या. बेडची व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा आणि आवश्यक असणारी उपचारांची साधने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने डॉ.विखे यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांनी बराच काळ अधिकारी आणि तेथील रूग्णांसोबत घालवून त्यांना दिलासा दिला. कोरोना काळातही विखे जिल्ह्यात बिनधास्त फिरून कार्यक्रम व बैठका घेत होते. मंगळवारी कोविड केअर सेंटरमध्ये जाताना मात्र त्यांनी मास्क लावल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *