नृत्य कलाकारांना शासनाने मदत करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नगर
कोरोना संकटामुळे बहुतांश घटकांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. याची झळ नृत्य कलाकारांनाही बसली आहे. सुमारे दीड वर्षांपासून या कलाकारांची कामे बंद झाली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या नृत्य कलाकारांची अवस्था मरणासन्न झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नृत्य कलाकार शासनाकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. फक्त आठवड्यातून दोन दिवस फक्त दोन तास तरी नृत्याचे वर्ग घेण्याची परवानगी द्यावी आणि नृत्य कलाकारांनाही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत करावी अशा मागण्या अहमदनगर नृत्य परिषदेने केली आहे.

शास्त्रीय नृत्य, लोककलावंत आणि पाश्चात्य नृत्य करणार्‍यांची अहमदनगरसह राज्यातील संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. यातील काही कलाकार नृत्याचे वर्ग घेतात. त्यातून मिळणारे उत्पन्न कमी आहे, तर जागेसाठी मोजावे लागणारे भाडे अधिक आहे. राज्यभरात 10 ते 12 लाख विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेतात. त्यामुळे नृत्य वर्ग हे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत उपजीविकेचे एक नवे साधन बनले आहे. मात्र हे साधन बंद झाल्याने नृत्य कलाकारांचे जगणे कठीण झाले आहे. मात्र, कोरोनामुळे कलाकारांचे जगणे दुरापास्त बनलेे आहे. नृत्य वर्गावर अवलंबून असणार्‍या पन्नास टक्क्यांहून अधिक कलाकारांची घरे स्वतःची नाहीत. त्यामुळे घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण, कर्जे आणि हप्त्यामुळे या व्यवसायावर निर्भर असणारे हे कलाकार आता रस्त्यावर आले आहेत. मात्र दीड वर्षात सामाजिक संस्था, नगरसेवक, आमदार, खासदार आणि सरकार यापैकी कोणीच मदत केली नसल्याचे नृत्य परिषद शाखा अहमदनगरचे कुलदीप कागडे, विनोद कागडे, प्रशांत दिवेकर, सागर अल्लचेट्टी, रणवीर लोट, आकाश अंडे, विनोद वाघमारे, पदाधिकारी व सभासद यांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने वरील मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *