उन्हापासून बचाव होण्यासाठी मिरचीच्या पिकाला साड्यांचे आच्छादन! खंडेरायवाडीतील शेतकर्‍याची अनोखी शक्कल; प्रवाशांचेही जातेय लक्ष

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव गोरक्षनाथ वाळुंज यांनी उन्हापासून मिरची पिकाचा बचाव होण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असल्याने पिकाचे संरक्षण करण्यासाठी साड्यांचे आच्छादन केले आहे. त्यामुळे मिरचीचा बाग विलोभनीय दिसत असून प्रवाशांचेही लक्ष वेधून घेत आहे.

पठारभागाला डोंगदर्‍यांसह मोठी वनसंपदा लाभलेली आहे. परंतु, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. अशाही परिस्थितीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग शेतीत राबवून उत्पादन घेतात. या भागातीलच पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या खंडेरायवाडी येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव वाळुंज यांनी पंचवीस गुंठे शेतीमध्ये मल्चिंग पेपरच्या सहाय्याने तेजापूर जातीच्या मिरचीची लागवड केली आहे. मात्र सध्या भीषण उन्हाळा चालू असल्याने रोपे कोमेजून जळू लागली आहेत. यावर रामबाण उपाय शोधत शेतकरी वाळुंज यांनी सुमारे पंधरा हजार रुपयांच्या साड्यांची खरेदी करुन थेट पिकावर आच्छादन केले आहे.

या अनोख्या शकलीमुळे कडक उन्हापासून पिकाचे संरक्षण होवून पाण्याची गरजही कमी भासणार आहे. याकामी त्यांना आत्तापर्यंत पन्नास हजार रुपयांचा खर्च आलेला असून तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, साड्यांच्या आच्छादनामुळे संपूर्ण शेती विलोभनीय दिसत असल्याने साकूर रस्त्यावरुन प्रवास करणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *