लोककलावंतांना जगवण्यासाठी संगमनेरात उभी राहतेय चळवळ! महाराष्ट्राची लोककला ‘जिवंत’ ठेवणार्‍यांवरच उपाशीपोटी राहण्याची वेळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन दिवसांपूर्वी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील माझा कट्टा या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणार्‍या तमाशा कलावंतांचे कोविडने उध्वस्त झालेले जीवन महाराष्ट्राने पाहिले. तमाशा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘कलाभूषण’ पुरस्कार मिळालेले रघुवीर खेडकर आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या आंतरिक शब्दांतून उलगडत गेलेल्या त्यांच्या संघर्षाच्या ठिणग्या सामान्य माणसाच्या हृदयाला मात्र चटका देणार्‍या ठरल्या. मुख्यमंत्र्यांपासून कार्यालयीन बाबूंपर्यंत सर्वांसमोर उपासमारीच्या व्यथा मांडूनही ‘सरकार’ नावाच्या व्यवस्थेकडून कोणतीही साथ मिळाली नाही. या काळात त्यांनी जे भोगलं ते सांगतांना त्यांनाही आसवात चिंब व्हावं लागलं इतका तो भयानक संघर्ष होता. या कार्यक्रमाने पुरोगामी महाराष्ट्रातील मर्‍हाठी मनंही हेलावली आणि त्यातूनच या सगळ्यांना पुन्हा सन्मानाने उभं करण्यासाठी संगमनेरात चळवळ उभी राहिली.

शेतात राबणारा कुणबी असो, अथवा रणांगणात मुर्दुमकी गाजवणारा शिपाई त्याला मनोरंजनाची निकड भासतच असते. महाराष्ट्राच्या प्राचीन लोकपरंपरेतील तमाशा याच श्रेणीत आघाडीवरचा. यात्रा-जत्रांच्या माध्यमातून दरवर्षी गावागावात फड लावून होणार्‍या कार्यक्रमातून सादर होणारी ही कला शेतकरी, मजूर, कष्टकरी आणि सामान्यजनांचे अविरत मनोरंजन करणारे मुख्य साधनच समजली जायचे. आज मोबाईल व इंटरनेटच्या काळात शहरीभागातून या कलेचे वलय धूसर झाले असले, तरीही ग्रामीणभागात मात्र आजही त्याचे आकर्षण टिकून आहे. दरवर्षी आपल्या गावच्या यात्रेत अमुक फडाचाच तमाशा पाहिजे म्हणून तमाशा पंढरी नारायणगावात यापूर्वी अनेकदा झालेल्या बोली आणि लिलाव ग्रामीण जीवनातील तमाशाचे महत्त्व स्पष्ट करणारेच आहेत.

मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना नावाच्या विषाणूंनी भारतीय भूमीत पाय ठेवले आणि अवघ्या महिन्याभरातच संपूर्ण देश ठप्प झाला. अचानक सगळंकाही थांबल्याने माणसं सैरभैर झाली, अशावेळी ऐन हंगामाच्या तोंडावरच यात्रा-जत्रांवरही मर्यादा आल्याने लोककलेवरच संसार चालविणार्‍यांच्या चुली विझल्या. त्या पुन्हा पेटाव्या, त्याद्वारे किमान दोनवेळचा घास आपल्या व आपल्या मुला-बाळांच्या पोटात जावा यासाठी त्यांचा संघर्ष सुरु झाला. संकटावेळी साथ देतं ते सरकार असं समजून तमाशा कलावंतांच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांपासून ते सरकारी कार्यालयातील बाबूंपर्यंत सर्वांसमोर लोटांगणे घातली, आर्जवं मांडली. नाहीच होत म्हटल्यावर आसवंही ढाळली मात्र सरकारकडूनही निराशाच पदरी पडली.

ज्या फडांसाठी राज्यातले गावप्रमुख बोली लावायचे, लिलाव करायचे त्यांनाही आपल्या आवडत्या फडाचा विसर पडला. काय करावं, कोणाकडे जावं, कोठून आणावं अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताना अखेर कोणीही आपल्या मदतीला येत नसल्याच्या वास्तवाचेही त्यांना दर्शन घडले. शेवटी फडातली माणसं जगली पाहिजे, त्यांना किमान एकवेळ तरी अन्न मिळाले पाहिजे या विवंचनेत फड मालकांनी आपल्याकडील सोनंनाणं विकलं, वाहनं विकली पण वर्ष उलटूनही परिस्थितीत काही बदल होईना. त्यातच कोविडच्या वर्षपूतीलाच पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागले आणि सलग दुसरा हंगामही वार्‍यासारखा उडून गेल्याने महाराष्ट्राची लोककला आणि ती जपणारे अशा दोहींचेही जीवन शेवटच्या घटका मोजत असतांनाच एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या मनामनातील माणूस जागवला.

संगमनेरला महाराष्ट्राच्या लोककलेचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या फटक्यांसाठी अजरामर झालेल्या कवी अनंत फंदी यांच्यापासून ते पवळा हिवरगावकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांच्यापर्यंतच्या तमाशा कलावंतांनी महाराष्ट्राची ही लोककला केवळ जिवंतच ठेवली नाही तर ती अधिक समृद्ध करण्याचे मोठे काम केले आहे. तमाशा कलावंतांवरील अभ्यासातून त्यांच्या जीवनाशी समरस झालेले संगमनेरातील साहित्यिक डॉ.संतोष खेडलेकर यांनी तमाशा कलावंतांची आसवं पुसण्याच्या उद्देशाने संगमनेरकरांना आवाहन केलं आणि एका चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. संगमनेरसह राज्यातील काही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी डॉ.खेडलेकरांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय. त्यातूनच ‘कलाभूषण रघुवीर खेडकर’ नावाचा सोशल समूह उभा राहिला आणि राज्यातील लोककलावंतांना शक्य ती मदत करण्यासाठी खर्‍याअर्थी महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग संगमनेरात होवू घातला आहे.

यासाठी ‘अहमदनगर जिल्हा तमाशा कलावंत मदत निधी’ या नावाने बँक खाते उघडले जात आहे. लवकरच त्याबाबतची माहिती सार्वजनिक पटलावर मांडून शक्य असेल तितकी मदत गोळा केली जाणार आहे. मदतीच्या स्वरुपानुसार तमाशा क्षेत्रातील किती लोकांना मदत करायची हे ठरणार आहे. मात्र चळवळ उभी करताना अहमदनगर जिल्हा केंद्रस्थानी मानून जिल्ह्यातील सर्वच तमाशा कलावंतांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करण्यात आला असून जनसहकार्य मिळाल्यास राज्यातील सर्व कलावंतांना मदत पोहोचवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. आपणही या कार्यात मदतीचा हात पुढे करावा व लोककलावंतांच्या जगण्याला हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेल्या तमाशा क्षेत्रात राज्यात सव्वादोनशेहून अधिक फड आहेत. त्यातील काही मोठ्या फडांमध्ये दोनशेहून अधिक माणसं काम करतात. हंगामाशिवाय वर्षातील इतर आठ महिने या सर्वांना सांभाळण्याची किमया फडमालक साधीत असतात. मात्र गेल्या वर्षी राज्यात आलेल्या कोविडने सलग दोन हंगामावर पाणी फेरल्याने आजच्या स्थितीत फडमालकांवरच उपासमारीची वेळ आली आहे, अशा स्थितीत त्यांना मदतीचा हात न मिळाल्यास महाराष्ट्राची लोक परंपरा समजला जाणारा तमाशा लृप्त होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. संगमनेरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तमाशा कलावंतांना आधार देण्यासाठी धडपड सुरू केली आहे, त्यात लोकसहभाग वाढला तर ही कला आणि ती सादर करणारे कलाकार दोघेही जिवंत राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *