संगमनेर मर्चंट्स बँकेला 5.43 कोटींचा करपूर्व नफा ः मालपाणी ठेवी 355.04 कोटींवर तर संमिश्र व्यवसाय 590.64 कोटी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच संपलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षात संगमनेर मर्चंट्स बँकेला 5 कोटी 43 लाखांचा करपूर्व नफा झाला आहे. विशेष बाब म्हणजे बँकेच्या सर्वही आठ शाखा नफ्यात राहिलेल्या आहेत. बँकेने मावळत्या आर्थिक वर्षात 590.64 कोटींचा संमिश्र व्यवसाय करून लक्षवेधी कामगिरी केली आहे. संमिश्र व्यवसायातील वृद्धीसह ठेवी व कर्ज वाटपात वाढ झाली आहे. नेट एनपीए 2.71 टक्के आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातही उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांनी बँकेवर शंभर टक्के विश्वास टाकून भक्कम साथ दिल्याने आर्थिक प्रगतीची वाटचाल अखंड सुरू राहिली असल्याची भावना बँकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी व्यक्त केली आहे. तर कोरोनाच्या कठीण काळातही बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वृंदाने ग्राहक सेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्याने त्यांचे योगदान अनमोल आहे असे मत उपाध्यक्ष संतोष करवा यांनी व्यक्त केले आहे.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी व त्यांच्या व्यापारी सहकार्‍यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या मर्चंट्स बँकेच्या प्रगतीचा आलेख 54 वर्षे सतत उंचावत ठेवण्यासाठी काटकसर करून केलेला पारदर्शक लोकाभिमुख कारभार कारणीभूत असल्याचे अध्यक्ष मालपाणी म्हणाले. बँकेने या वर्षात 1.25 कोटी आयकर भरून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. अंतर्गत तरतुदीसाठी उपलब्ध केलेला निधी 1.15 कोटी इतका असून आयकर वजा जाता करोत्तर निव्वळ नफा 3.03 कोटी झाला आहे. यंदा एकूण कर्ज वाटप 235.60 कोटी इतके करण्यात आले आहे. बँकेचे वसूल भाग भांडवल 7.96 कोटी झाले असून 30.48 कोटींचा भक्कम स्वनिधी बँकेकडे आहे. कोविडमुळे संचालक मंडळाने 23 जून, 2020 रोजी विशेष ठराव मंजूर करून कर्जदार ग्राहकांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून 1 एप्रिल, 2020 पासून सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात व 2020-21 या वर्षासाठी 0.50 टक्के अतिरिक्त रिबेट (परतावा) देण्याचा महत्वाचा निर्णय घेतल्याने अनेकांना त्याचा लाभ झाला. तसेच आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदरात 0.25 ते 0.50 टक्के व्याजदरात कपात करण्याचा व 0.50 टक्के अतिरिक्त रिबेटचा निर्णय घेतला आहे असेही मालपाणी पुढे म्हणाले.

दरम्यान, कोरोनापासून सावधान राहण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी बँकेत न येता 2 लाखांपर्यंतचे व्यवहार घरून अथवा दुकानातूनच मोबाईल बँकिंगद्वारे करावेत. नोटा हाताळण्याऐवजी डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त वापर सर्वांनी करावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. यावेळी बँकेचे संचालक श्रीगोपाल पडतानी, दिलीपकुमार पारख, सुनील दिवेकर, राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, डॉ.संजय मेहता, सतीश लाहोटी, गुरुनाथ बाप्ते, ओंकार सोमाणी, राजेश करवा, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, ज्ञानेश्वर करपे, डॉ.अर्चना माळी, ओंकार बिहाणी, सीए.संजय राठी, कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम, सेवक प्रतिनिधी तुकाराम सांगळे, सेवक प्रतिनिधी राहुल जगताप यांसह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *