संचालक व सभासदांच्या सहकार्यामुळे संस्था प्रगतीपथावर ः कुटे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्यामुळे संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब कुटे यांनी केले आहे.

संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीच्या 46 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सर्व सभासदांचे हित निश्चित जोपासले जाईल. तसेच सभासदांना जास्तीत जास्त बाजारभाव, दीपावलीनिमित्त अनामत व रिबेट, लाभांश दिला जाईल. संस्थेच्या कामकाजात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे व दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने संस्था उत्तमरित्या कारभार करत असल्याचे शेवटी नमूद केले. तर जिल्हा परिषद सदस्य आणि मार्गदर्शक भाऊसाहेब कुटे म्हणाले, सध्या खासगीकरणाला तोंड द्यावे लागत आहे. ज्यावेळेस दूध उत्पादन कमी असते त्यावेळेस खासगी संस्था जास्त दराने दूध खरेदी करतात. मात्र उत्पादन जास्त असताना उत्पादकांना जास्त दर देत नाहीत. याउलट सहकारी संस्था नेहमीच या स्पर्धेला तोंड देत दूध उत्पादकांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतात. जर सहकारी संस्था कोलमडून पडल्या तर खासगी संस्था दूध उत्पादकांना अक्षरशः लुटतील. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने सहकारी संस्था टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तत्पूर्वी रामनाथ कुर्‍हे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्यास संस्थेचे उपाध्यक्ष विलास मेहेर यांनी अनुमोदन दिले. व्यवस्थापक जालिंदर पानसरे यांनी नफा-तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले. यावेळी उत्कृष्ट दूध उत्पादन घेणार्‍या उत्पादकांचा सन्मान करण्यात आला. या सभेस कोपरगावचे वाल्मिक कोळपे, संजय रोहमारे, बाबासाहेब कोळपे, माणिक बिडगर, भास्कर शेरमाळे, सुकेवाडीच्या सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाष कुटे, बाजीराव गुंजाळ, विलास गुंजाळ, रामचंद्र रहाणे यांसह संचालक मच्छिंद्र सातपुते, दत्तात्रय हिरे, गेणू कुटे, देवीदास जाधव, अशोक गुंजाळ, भाऊसाहेब पानसरे, यशवंत शेलकर, अशोक जगताप, अनिल कुटे, संभाजी गुंजाळ, सुशीला अरगडे, विजया राऊत, राजेंद्र तुपे, भाऊसाहेब शेरमाळे, सुनील अरगडे, सुरेश काळे, दत्तात्रय गुंजाळ आदी उपस्थित होते. पोपट आगलावे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *