अहमदनगर जिल्ह्याच्या कोविड इतिहासातील सर्वाधिक रुग्णवाढ आज! अहमदनगर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर व कर्जत तालुक्यात कोविडचा उद्रेक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवी चुकांमुळे परतलेल्या कोविडच्या विषाणूंनी जिल्ह्याची अवस्था कठीण वळणावर नेवून ठेवली असून गेल्या वर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात शिरलेल्या कोविडने आज गेल्या बारा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रम नोंदविला आहे. आजच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रात कोविडचा सर्वाधिक वेग असून तेथून तब्बल 433 रुग्ण समोर आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून आज 1 हजार 680 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात संगमनेर तालुक्यातील तब्बल 105 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 8 हजार 569 तर जिल्ह्याची रुग्णसंख्या 94 हजार 922 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोविडने अक्षरशः हाहाकार माजवला असून दुसर्‍या संक्रमणाचा सर्वाधिक फटका अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एकूण चौदा तालुक्यांमध्ये या पाच तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असून सक्रीय संक्रमितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता असून प्रशासनाने यापूर्वीच दहावी व बारावीचे वर्ग वगळता 30 एप्रिलपर्यत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याच्या निर्णयासह रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू असली आणि त्याला जिल्ह्यातून मोठा प्रतिसादही मिळालेला असला तरीही त्याचा कोणताही परिणाम रुग्णवाढीवर झालेला दिसून येत नसल्याचेही आजच्या विक्रमी रुग्णवाढीतून स्पष्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार देशभरातील दहा जिल्ह्यांमध्ये कोविड संक्रमणाचा वेग अधिक असून मंगळवारी त्या यादीत देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यावरुन जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग सहज लक्षात येण्यासारखा आहे. मागील काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत एकसारखी वाढ होत असल्याने जिल्हा ‘लॉकडाऊन’च्या दाराशी उभा असल्याचेही जाणकारांचे मत आहे. मात्र राज्य सरकार त्याबाबत अद्याप अनुकूल नसल्याने या निर्णयाकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून 677, खासगी प्रयोगशाळेकडून 514 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 489 अशा जिल्ह्यातील एकूण 1 हजार 680 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधिक 433 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. त्या खालोखाल राहाता 229, श्रीरामपूर 116, कोपरगाव 114, संगमनेर 105, कर्जत 101, राहुरी 92, नगर ग्रामीण 74, पाथर्डी 63, अकोले व शेवगाव प्रत्येकी 61, पारनेर 60, नेवासा 55, जामखेड व श्रीगोंदा प्रत्येकी 37, लष्करी क्षेत्रातील 16, लष्करी रुग्णालयातील 14 व इतर जिल्ह्यातील 12 रुग्णांचा समावेश आहे. रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्याची कोविड स्थिती अवघड झाली आहे.

कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाचा फटका अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तीन तालुक्यांना सर्वाधिक बसला आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येतील 64 टक्के (1071) रुग्ण या पाच तालुक्यातूनच समोर आले आहेत. त्यामुळे या ठिकाणांच्या आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. त्यासोबतच अहमदनगर व संगमनेर येथील बाजारपेठांमध्ये होणारी उलाढाल जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोविडच्या वाढलेल्या प्रादुर्भावाचा फटका या दोन्ही ठिकाणच्या बाजारपेठांनाही बसला आहे. भीतीपोटी बाजारांमध्ये वर्दळही रोडावल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *