तनपुरे कारखान्याची सभा गाजण्याची चिन्हे सभा अवैध ठरविण्याची सभासदांकडून लेखी तक्रार

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा येत्या रविवारी (ता.28) दुपारी दोन वाजता कोरोना निर्बंधामुळे ऑनलाईन होत आहे. या सभेत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी व लेखी सूचना मांडण्याची तारीख संपली तरी सभेची नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे ही सभा अवैध ठरविण्याची लेखी तक्रार सभासदांनी केली आहे. यामुळे वादाला तोंड फुटल्याने सभा गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

तनपुरे कारखान्याची पंचवार्षिकमधील ही शेवटची सभा आहे. यंदाचे वर्ष निवडणुकीचे आहे. त्यामुळे राजकीय वातावरण निर्मितीसाठी वार्षिक सभेची संधी विरोधी गटाकडे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशामुळे ऑनलाईन सभा होत आहे. सभेत भाग घेण्यासाठी, धोरणात्मक लेखी सूचना देण्यासाठी सभासदांना सोमवारपर्यंत (ता.22) मुदत दिली होती. कारखान्याच्या शेतकी खात्याने सभासदांना नोटीस वाटपाची व्यवस्था केली. मात्र, शेतकी खात्याच्या कर्मचार्‍यांची इंजिनिअरिंग व रसायन विभागात बदली केल्याने, नोटीस वाटपासाठी कर्मचारी अपुरे पडले.

अनेक माजी संचालक व सभेत बोलू इच्छिणार्‍या सभासदांना विहीत मुदतीत नोटीस पोहोचली नाही. त्यामुळे अमृत धुमाळ, पंढरीनाथ पवार, अजित कदम, बाळासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर कोळसे, रवींद्र मोरे, सुभाष करपे, अजित धुमाळ, बाबा देशमुख, बाळासाहेब खांदे, रामदास वने आदिंसह 26 सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) व कारखाना प्रशासनाकडे लेखी तक्रारी करीत सभा अवैध ठरविण्याची मागणी केली आहे.

कारखाना मालमत्तेवर व्यवस्थापनाचा डोळा आहे. भंगार व जमीनविक्रीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. बगॅस, मोलॅसेस विक्रीचा हिशेब नाही. सभासदांची परवानगी नसताना आसवनीच्या परवाना विक्रीचा घाट घातला. सभेत उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी मोजक्या सभासदांना नोटिसा दिल्या.
– अमृत धुमाळ (सरपंच, मुसळवाडी)

सभेची नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आहे. चार हजार सभासद, ग्रामपंचायत व सेवा संस्थांच्या कार्यालयांत नोटिसा दिल्या आहेत. ऑनलाईन लिंक सभासदांना दिली जाईल. कोरोना निर्बंध पाळून सभेस प्रत्यक्ष उपस्थित सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देवू. कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे. आम्हाला लपवाछपवी करायची नाही.
– नामदेव ढोकणे (अध्यक्ष, तनपुरे कारखाना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *