कत्तलखाने बंद असल्याचा संगमनेरकरांच्या भ्रमाचा फुगा फुटला! संगमनेरातून दिड हजार किलो गोवंशाचे मांस घेवून निघालेला टेम्पो घोटी पोलिसांच्या ताब्यात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर पोलिसांनी ‘बंद’ असल्याचे भासवलेल्या कत्तलखान्यांमधून मुंबईच्या दिशेने निघालेले तब्बड दिड टन वजनाचे गोवंशाचे मांस घोटी पोलिसांनी आज पहाटे पकडले. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून संगमनेरात ‘रामराज्या’चा निर्माण केलेला फुगा आपोआप फुटला आहे. या प्रकरणात घोटी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना अटक केली आहे, न्यायालयाने अटकेतील दोघांनाही दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे. आरोपींमध्ये संगमनेरातील एकाचा समावेश आहे. या कारवाईने संगमनेरात सगळंकाही ‘अलबेल’ असल्याचा केवळ ‘अभास’ असल्याचेही स्पष्ट केले आहे.


याबाबत घोटी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिन्नरहून घोटीच्या दिशेने जाणार्‍या महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास नाकाबंदीत सदरचे वाहन अडकले. सुरुवातीला वाहनात भाजीपाला असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र यापूर्वी संगमनेर शहरात सेवा बजावून घोटी पोलीस ठाण्यात रुजू झालेल्या नाकाबंदीवरील पोलीस अधिकार्‍याच्या डोळ्यात ते धुळ झोकू शकले नाहीत. सदरच्या वाहनातून पाणी गळत असल्याने व वाहनाजवळ जाताच उग्र दर्प जाणवत असल्याने संबंधित अधिकार्‍याने सदरचे वाहन बाजूला उभे करुन त्याची तपासणी केली.


यावेळी बर्फाच्या तुकड्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस दडवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सदरच्या वाहनातील मांसाची मोजदाद केली असता त्यात दिड लाख रुपये किंमतीचे सुमारे 1 हजार 500 किलो गोवंशाचे मांस आढळले. या प्रकरणी घोटी पोलिसांनी अब्दुल मतीन इमानुल्लाह शहा (वय 35, रा.डंपींगरोड, मुंबई), अहसान लोधी कुरेशी (वय 28, रा.कुर्ला, मुंबई), कमरअली गुलाम कुरेशी (भारतनगर) वसीम कुरेशी (रा.मुंबई) अशा चौघांवर गुन्हा दाखल दाखल करीत पहिल्या दोन आरोपींना अटक करीत आज (ता.23) दुपारी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी दोन दिवसांसाठी कोठडीत केली आहे.


या कारवाईत घोटी पोलिसांनी चार लाख रुपये मूल्याचे पांढर्‍या रंगाचे महिंद्र पिकअप वाहन (क्र.एम.एच.04/एच.डी.5668) व दिड लाख रुपयांचे गोवंशाचे मांस असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला जप्त केलेल्या गोवंश मांसाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे करीत आहेत.


संगमनेर पोलीस ठाण्यातील प्रभार्‍यांचा खांदेपालट विधी पार पडल्यानंतर पोलिसांनी काही दिवस संगमनेरातील कत्तलखान्यांवर सलग कारवाया करीत दरारा निर्माण केला होता. त्यानंतर हळुहळु कारवायांचे प्रमाण कमी करण्यात येवून ते थांबले. यातून शहर पोलिसांनी संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने पूर्णतः बंद झाल्याचे अभासी चित्र उभे केले होते, तेच सत्य मानून संगमनेरकर आजवर कत्तलखाने बंद आहेत या भ्रमात होते. मात्र घोटी पोलिसांनी संगमनेरकरांच्या भ्रमाच्या फुग्याला टाचणी टोचली असून संगमनेरातील अवैध धंदे बंद असल्याचा केवळ अभास असल्याचे सिद्ध केले आहे.

संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवर आजवर शेकडों कारवाया होवून हजारों किलो गोवंशाचे मांस आणि असंख्य वाहने जप्त करण्यात आली. जप्त झालेली वाहने काही दिवसांनी पुन्हा याच उद्योगात आढळली हा दुसरा भाग. मात्र संगमनेरातील अशा असंख्य कारवायात अटक झालेल्या आरोपींची अपवाद वगळता कधीही पोलीस कोठडी मागण्यात आली नव्हती. त्यामागे सदरचा गुन्हा जामीनपात्र असल्याचे कारण सांगीतले जात. मात्र घोटी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींना तेथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने ‘संगमनेरचे कत्तलखाने आणि पोलीस’ यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांचा अंदाज सहज बांधता येवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *