डॉ.संजय मालपाणी यांच्या नेतृत्त्वावर सभासदांना ठाम विश्वास! संगमनेर-अकोले तालुक्याच्या शिक्षण गंगोत्रीची निवडणूक झाली बिनविरोध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर-अकोले तालुक्याच्या शिक्षणाची गंगोत्री समजल्या जाणार्‍या शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध झाली आहे. डॉ.संजय मालपाणी यांच्या नेतृत्त्वाखालील कार्यकारी मंडळाने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत महाविद्यालयाचा बदललेला चेहरा, मानांकनात घेतलेली झेप, पुणे विद्यापीठात सर्वोत्कृष्ट ठरण्याच्या बहुमानासह मिळवलेली स्वायत्तता, प्रगतीच्या दिशेने सुरु असलेली ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी सभासदांनीच पुढाकार घेतला आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या पायाभरणीची अठरा एकर जमीन दान देणार्‍या क्षत्रिय परिवारातील प्रकाश क्षत्रिय यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संस्थेत नऊ पदाधिकार्‍यांसह कार्यकारी मंडळाचे एकूण सदस्य एकोणचाळीस आहेत. अ‍ॅड.आर.बी.सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

संगमनेर, अकोले सारख्या डोंगरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी साठ वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना झाली. गत सहा दशकांत संस्थेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. मात्र गेल्या दोन दशकांत त्यातून बाहेर पडत कधीकाळी पर्याय म्हणून पाहिल्या जाणार्‍या या संस्थेला स्वायत्त शिक्षणाचा दर्जा प्राप्त करुन देण्यापर्यंतचा दैदीप्यमान प्रवास घडला. गेल्या पाच वर्षात संस्थेद्वारा दिल्या जाणार्‍या शिक्षण सुविधेचा दर्जा, त्यासाठीची व्यवस्था आणि एकंदरीत व्यवस्थापन यांचे मूल्यांकन असलेले नॅकचे ए प्लस मानांकन संस्थेला मिळाले. त्यासोबतच सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील सर्वोच्च महाविद्यालयाचा बहुमान आणि स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा या दोन्ही गोष्टी मागील कार्यकारी मंडळाच्या कामाला सुवर्ण मुलामा देणार्‍या ठरल्या. संस्थेच्या प्रगतीची ही घोडदौड अशीच सुरु रहावी यासाठी सभासदांनीच पुढाकार घेवून निवडणूक टाळली आणि समन्वयाचा मेळ जुळवून शिक्षण प्रसारक संस्थेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.

संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश क्षत्रिय यांची निवड झाली. सहा दशकांपूर्वी शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्थापनेवेळी क्षत्रिय परिवाराने अठरा एकर जमीन देवून संस्थेची पायाभरणी केली होती. त्या परिवारातील सदस्याची आज संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अ‍ॅड.प्रदीप मालपाणी, डॉ.आशुतोष माळी, डॉ.अशोक पोफळे, डॉ.सोमनाथ सातपुते, जनरल सेक्रेटरीपदी सीए.नारायण कलंत्री, विश्वस्तपदी मदनलाल करवा, डॉ.ओमप्रकाश सिकची, डॉ.अरविंद रसाळ, कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी डॉ.संजय मालपाणी, अनिल राठी, राजकुमार गांधी, जसपाल डंग, संतोष करवा, अमित पंडित, अनिल आट्टल, विलास सराफ, नंदलाल पारख, केदारनाथ राठी, रवींद्र पवार, अ‍ॅड.राजेश भुतडा, अनिल सातपुते, श्रीहरी नावंदर, दीपककुमार शाह, सीए.कैलास सोमाणी, नंदनमल बाफना, नरेंद्र चांडक, मनीष मणियार, संदीप चोथवे, दीपक जाजू, सचिन पलोड, मधूसुदन नावंदर, अरविंद कासट, ज्ञानेश्वर काजळे, के.के.थोरात, अरुण ताजणे, बाळासाहेब देशमाने, महेश डंग आणि गंगाधर सातपुते यांची शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.

डॉ.संजय मालपाणी यांच्या नेतृत्त्वाखालील कार्यकारी मंडळाने मागील पाच वर्षांच्या काळात संस्थेच्या प्रगतीचा आलेख गगनाला भिडवला. त्याचा परिपाक महाविद्यालयाला ए प्लस दर्जा मिळण्यासोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमानही मिळाला. संगमनेर महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्त विद्यापीठाची मान्यता कार्यकारी मंडळांच्या गेल्या पाच वर्षांतील कामाला सुवर्ण झालर लावणारी ठरली. त्याचा परिणाम प्रगतीची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सभासदांच्या पुढाकारातून ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *