जाचकवाडीच्या प्रयोगशील शेतकर्‍याने अंजीर लागवडीत साधली किमया! बाजारात मोठी मागणी असल्याने प्रति किलोला मिळतोय शंभर रुपयांचा भाव

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जाचकवाडी येथील प्रयोगशील शेतकरी कारभारी कमळू महाले व त्यांचा मुलगा योगेश यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर चार एकर शेतात अंजीराच्या बागा फुलवल्या आहेत. बाजारात अंजीर फळाला मोठी मागणी असल्याने प्रति किलो शंभर रुपयांचा भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर जाचकवाडी हे गाव वसलेले आहे. शेतकरी महाले यांना सुरूवातीपासूनच शेतीची प्रचंड आवड असल्याने कायमच नवनवीन प्रयोग राबवत शेतीमध्ये किमया साधली आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी त्यांनी द्राक्षे व डाळींबाच्या फळबागा केल्या होत्या. मात्र त्यात त्यांना मोठे उत्पन्न मिळाले नाही. यातून आर्थिक फटका बसल्यानंतर त्यांनी अंजीर लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रथम 2000 मध्ये तीस गुंठे शेतीत दीडशे अंजीरांच्या झाडांची लागवड केली. पुढे अंजीरामध्ये चांगले पैसे मिळू लागल्याने आज जवळपास महाले यांच्या चार एकर शेतात दोन हजार अंजीरांची झाडे आहेत. सध्या अंजीर फळ काढणीचा हंगाम सुरू झाला असून पुणे जिल्ह्यातील ओतूर, बेल्हे, आळेफाटा, कोतूळ आदी ठिकाणच्या बाजारांमध्ये महाले स्वत्तः अंजीर विकण्यासाठी घेवून जात आहे.

प्रलि किलोला जवळपास शंभर रुपयांचा भाव मिळत असल्याचे शेतकरी महाले यांनी सांगून साधारण चार ते पाच महिने फळ काढणीचा हंगाम चालू राहत असल्याचेही सांगितले. या हंगामातून दहा ते बारा लाख रूपये मिळतील अशी अपेक्षा महाले यांची आहे. विशेष बाब म्हणजे अंजीरांच्या बागांना खर्चही खूप कमी लागत असून जास्त करून शेणखतांचा वापर केलेला आहे. त्यामुळे इतर बागांच्या तुलनेत खूप कमी खर्च येत आहे. जवळपास एका अंजीराच्या झाडाला वीस किलो फळे निघत असतात. रोज मोठी मागणी वाढत असल्याने यंदाचा हंगाम आर्थिकदृष्ट्या उत्तमरित्या निघेल अशी अपेक्षाही प्रयोगशील शेतकरी महाले यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *