शिर्डीतील बुंदी लाडूचा साईप्रसाद पुन्हा सुरू! दर्शन रांगेतच भाविकांना देण्यात येतोय मोफत

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीतील बुंदी लाडूचा साईप्रसाद पुन्हा सुरू करण्यात आला असून आता दर्शन रांगेतच भाविकांना हा प्रसाद मोफत देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेला हा वैशिष्ट्यपूर्ण प्रसाद शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दर्शन घेऊन परतणार्‍या प्रत्येक भक्ताला 50 ग्रॅम वजनाचा एकच लाडू देण्यात येणार आहे.

लॉकडाऊननंतर मंदिर पुन्हा खुले झाले असले तरी हा प्रसाद सुरू करण्यात आला नव्हता. तो सुरू करण्याची भाविकांची मागणी होती. मधल्या काळात काही खासगी विक्रेत्यांनी असे लाडू तयार करून साईप्रसाद म्हणून विकण्यास सुरवात केली होती. शिर्डीतील या वैशिष्ट्यपूर्ण प्रसादाची सवय झालेले भाविक ते खरेदी करीत होते. आता शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेच हा लाडूचा प्रसाद पुन्हा सुरू केला आहे. सुधारित पद्धतीने तयार करण्यात आलेला हा प्रसाद मोफत देण्यात येत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रयोगिक तत्वावरहा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यात आवश्यक ते बदल करण्याचा पर्याय खुला असल्याचे सांगण्यात आले.

साईबाबा संस्थानमार्फत 1990 पासून शिर्डीत येणार्‍या साईभक्तांना हा प्रसाद विकत दिला जात होता. तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची घालून बुंदीचे लाडू तयार केले जात होते. त्यानंतर 2013 पासून दर्शन रांगेत भक्तांना पन्नास ग्रॅम वजनाचा एक लाडू मोफत दिला जाऊ लागला. कोरोना काळात मंदिर बंद झाल्यापासून ही पद्धत बंद झाली होती. सशुल्क आणि मोफत दोन्ही प्रकराचे लाडू बंद झाले होते. भाविकांची मागणी लक्षात घेता आता पुन्हा या लाडूंचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. शनिवारपासून (ता.6) दर्शन रांगेतील मोफत लाडू वाटप पुन्हा सुरू करण्यात आले आहे. साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना दर्शन झालेनंतर दर्शनरांगेतच 50 ग्रॅम वजनाचा 1 बुंदीचा लाडू प्रसादरूपाने पाकिटातून मोफत दिला जात आहे. हा लाडू शास्त्रोक्त पध्दतीने तयार करण्यात येत असून त्याचा वापर 24 तासांच्या आतच करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *