गोवंश कत्तलखाने बंद असल्याचा पोलिसांचा दावा ठरला खोटा! पठारावरील डोळासणे शिवारात भरधाव टेम्पो उलटून शेकडों किलो मांस रस्त्यावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बेकायदा कत्तलखाने आणि त्यात दररोज होणारी शेकडों गोवंश जनावरांची कत्तल संगमनेरकरांसाठी नवीन नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आज सकाळी संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात झालेल्या अपघाताने मात्र तो खोटा ठरविला आहे. अर्थात अपघातग्रस्त वाहन पलटी होवून त्यात लपवून ठेवलेले शेकडों किलो गोवंशाचे मांस महामार्गावर विखुरताच ‘त्या’ वाहनाच्या चालकाने धुमऽ ठोकल्याने सदरचे मांस कोठून आणले गेले होते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या अपघातामुळे पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.


याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज (ता.8) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेरहून पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर डोळासणे शिवारात सदरची घटना घडली. या मार्गावरुन एक मालवाहतुक ट्रक पुण्याकडे जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पीकअप वाहनाने (क्र.एम.एच.47/ई.2760) सदरच्या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यानंतर सदरचा पीकअप टेम्पो जागीच पलटी झाला आणि अवैध कत्तलखान्यांचे बिंग फुटले.


रस्त्याच्या मधोमध पीकअप पलटी झाल्याने त्यात दडवून ठेवलेले शेकडों किलों गोवंशाचे मांस रस्त्यावर विखुरले गेले. त्यामुळे घाबरलेल्या पीकअप वाहनाच्या चालकाने तेथून पळ काढला. ज्या मालवाहक ट्रकला टेम्पोची धडक बसली त्याच्या चालकाने याबाबत महामार्ग पोलिसांना सूचना दिली. मात्र तो पर्यंत डोळासणे शिवारातील पुण्याकडे जाणार्‍या महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.


महामार्गावर सर्वत्र गोवंशाचे मांस आणि बर्फाचे तुकडे पसरलेले असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली होती. महामार्ग पोलिसांनी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावरील गोवंश मांस गोळा करुन दरीतच खड्डा घेवून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर पलटी झालेला टेम्पो बाजूूला करण्यात आला. तोपर्यंत नाशिकच्या बाजूला पुण्याकडे जाणारे वाहने सोडण्यात आल्याने या भागातील वाहतुक मंदावली होती. सुमारे तासाभरानंतर दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेतला आहे.


राज्यातील काही मोठ्या शहरांसह थेट कर्नाटकातील गुलबर्गापर्यंत गोवंशाचे मांस पुरविण्यात संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांचा मोठा वाटा आहे. या अवैध व्यवसायातून दररोज लाखों रुपयांची उलाढाल होत असल्याने आजवर शेकडों वेळा येथील कत्तलखान्यांवर कारवाया होवूनही ते पूर्णतः बंद होवू शकलेले नाहीत. किंबहुणा संगमनेरातील अशा दहा मोठ्या कत्तलखान्यांपैकी जवळपास सात कत्तलखाने आजही सर्रासपणे सुरु असून सदरच्या अपघातग्रस्त वाहनातील गोवंशाचे मांस तेथीलच असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


विशेष म्हणजे संगमनेरातील सर्व बेकायदा कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याचा दावा संगमनेर पोलिसांनी वारंवार केला आहे. मात्र आज सकाळी डोळासणे शिवारात घडलेल्या अपघाताने तो खोटा ठरवला आहे. अर्थात सदरचे गोवंशाचे मांस संगमनेरातील कत्तलखान्यांमधूनच वाहून नेले जात होते का? या प्रश्‍नाचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. मात्र सदरचे मांस संगमनेरातीलच असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने तपासानंतर वास्तव चित्र स्पष्ट होईल.


संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने रात्रीच्यावेळी चालतात व पहाटेच्यावेळी तेथून गोवंशाचे मांस घेवून अनेक वाहने वेगवेगळ्या दिशांना निघतात. मात्र गेल्या काही वर्षात वेळेच्या या गणितात पोलिसांनी छापेमारी सुरु केल्याने संगमनेरातील कसायांनी गोवंशाचे मांस वाहतुक करुन नेण्यासाठीच्या वेळेत बदल केला की काय अशीही शंका निर्माण झाली आहे. घारगाव पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेतला असून त्याच्या मालकाचा शोध सुरु आहे. मात्र घारगाव पोलिसांची कार्यपद्धती पाहता त्यांच्या तपासातून ‘सत्य’ बाहेर येण्याची शक्यता धुसरच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *