अल्प विश्रांतीनंतर भंडारदर्‍याचे पाणी पुन्हा जायकवाडीकडे!

अल्प विश्रांतीनंतर भंडारदर्‍याचे पाणी पुन्हा जायकवाडीकडे!
पाणलोटातील पावसाचा जोर वाढल्याने भंडारदर्‍याच्या सांडव्याचे दार करकरले
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या आठवड्यापासून ओसरलेल्या पावसाने शुक्रवारी भंडारदर्‍याच्या पाणलोटात धुवाँधार बॅटींग केली. त्यामुळे शंभर टक्के भरलेल्या भंडारदर्‍यातील पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे दार पुन्हा करकरत उघडण्यात आल्याने प्रवरा पुन्हा दुथडी भरुन वाहु लागली आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठाही 93 टक्क्यांवर गेल्याने आज पहाटेपासून धरणातून 6 हजार 531 क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याने महाकाय जायकवाडी जलाशयाकडे पुन्हा एकदा पाण्याचा ओघ सुरु झाला आहे.


गेल्या आठवड्यात धोऽधो करीत बरसणार्‍या वरुणराजाचा जोर चार दिवसांपूर्वी मंदावल्याने धरणातून सोडल्या जाणार्‍या पाण्यात मोठी कपात करण्यात आली. त्यातच ऑगस्ट संपत आल्याने तांत्रिक पातळीवर नियंत्रित केलेले भंडारदरा धरण शंभर टक्के भरण्यात आले, त्यामुळे दररोजच्या कमी-अधिक पावसाचे धरणात दाखल होणारे पाणी नदीपात्रातून निळवंड्यात सोडण्यास सुरुवात झाली. त्यातून निळवंड्याचा पाणीसाठाही फुगला. मात्र पावसाचा जोर कमी झाला असला तरीही संततधार कायम असल्याने धरणांच्या सुरक्षिततेसाठी निळवंडे धरणाची पाणी पातळी 90 टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर अगदीच कमी झाल्याने निळवंड्यातून सोडल्या जाणारे पाणीही अगदीच पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाइतक्या प्रमाणात सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून दुथडी वाहणारी अमृतवाहिनी संकुचित झाली होती.


मात्र शुक्रवारच्या मूळ नक्षत्राने भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोटात पुन्हा ढगांची जमवाजमव केल्याने शुक्रवारी दुपारनंतर पाणलोटातील पावसाला जोर चढला, त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही वाढल्याने धरण व्यवस्थापनाने चार दिवसांपासून बंद केलेल्या सांडव्याची चाके आज पहाटे पुन्हा गरगरा फिरवून सांडव्याचा लोखंडी दरवाजा करकर करीत वर उचलण्यात आला व त्यातून तब्बल 3 हजार 248 क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम निळवंड्यातील पाणीसाठा फुगण्यात झाल्याने आज सकाळी 6 वाजता सुरुवातीला निळवंडे धरणाच्या विद्युतगृहाद्वारे 710 क्युसेक्स तर सांडव्याद्वारे 5 हजार 756 क्युसेक्सने वाढ करण्यात आली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यात आणखी वाढ करुन 6 हजार 531 क्युसेक्सने पाणी सोडले जावू लागल्याने प्रवरानदी पुन्हा एकदा दोन्ही पात्रांना कवेत घेत वाहू लागली आहे.


सकाळी सोडण्यात आलेले पाणी अद्याप ओझर बंधार्‍यापर्यंत पोहोचलेले नाही. आज दुपारपर्यंत हे पाणी ओझर बंधारा ओलांडून प्रवरापात्रातून जायकवाडीच्या दिशेने सरकेल. सद्यस्थितीत दुपारी दोन वाजता ओझर बंधार्‍यावरुन प्रवरापात्रात 3 हजार 482 क्युसेक्सचा विसर्ग सुरु असून त्यात दुपटीने वाढ होणार आहे. गेल्या चोवीस तासात लाभक्षेत्रात किरकोळ सरी कोसळल्या तर पाणलोटातील घाटघर येथे 172 मिलीमीटर, पांजरे येथे 142 मिलीमीटर, भंडारदरा 73 मिलीमीटर, रतनवाडी 62 मिलीमीटर, वाकी 63 मिलीमीटर व निळवंडे येथे 23 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. आज सकाळी 6 वाजता भंडारदरा धरणात क्षमतेएवढे तर निळवंडे धरणात 7 हजार 682 द.ल.घ.फूट (92.33 टक्के) व मुळा धरणात 24 हजार 418 द.ल.घ.फूट (93.92 टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *