… अखेर सहाव्या दिवशी वाहून गेलेल्या शरदचा मृतदेह सापडला

… अखेर सहाव्या दिवशी वाहून गेलेल्या शरदचा मृतदेह सापडला
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रवरा नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या कोल्हेवाडी येथील शरद धोंडिबा कोल्हे (वय 27) या तरुणाचा अखेर सहाव्या दिवशी शनिवारी (ता.29) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सापडला आहे. वाघापूर येथील स्मशानभूमीजवळ प्रवरा नदीपात्रात वाहून जात असताना मृतदेह आढळून आला. यामुळे महसूल प्रशासनासह त्याच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आणि सर्वांनीच अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.


संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील शरद धोंडिबा कोल्हे आणि सुनील चांगदेव आहेर हे दोघे तरुण संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीवर असणार्‍या छोट्या पुलावरून पुराच्या पाण्यात रविवारी दुचाकीसह वाहून गेले होते. मात्र त्यातील सुनील आहेर यास काही तरुणांना त्याच दिवशी मोठ्या पुलाजवळ वाचविण्यात यश आले होते. परंतु शरद कोल्हे हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचा गेली चार ते पाच दिवसांपासून महसूल प्रशासन व त्याचे नातेवाईक पोहणार्‍या तरुणांच्या मार्फत पाणबुडी आणि कोपरगाववरून आणलेल्या होडीच्या साह्याने संगमनेर खुर्द, निंबाळे, वाघापूर, खराडी, जोर्वे व ओझर बंधार्‍यापर्यंत नदीपात्रात त्याचा शोध घेतला गेला. मात्र गेल्या पाच दिवसांमध्ये त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आता शरदचा मृतदेह सापडणे शक्य नाही असे मानून नातेवाईक आणि महसूल प्रशासनाने तो खेळ सोडून दिला होता. अखेर वाघापूर शिवारातील प्रवरा नदीपात्रातलगत असणार्‍या स्मशानभूमी जवळून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एक मृतदेह वाहून जात असल्याचे परिसरातील काही ग्रामस्थांच्या लक्षात आले; त्यांनी तात्काळ ही माहिती कोल्हेवाडी येथील शरद कोल्हे यांच्या नातेवाईकांना दिली.

माहिती मिळताच कोल्हे यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा मृतदेह शरदचा असल्याचे ओळखले, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह कुजून गेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत शरदचा मृतदेह शोधण्यासाठी तहसीलदार अमोल निकम यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. त्यासाठी कोपरगावहून बोट आणि नाशिकहून पाणबुडी पाचारण केली होती. तसेच प्रवरा नदीकाठावरील सर्व तालुक्यांचे तहसीलदार आणि पोलीस ठाण्यांशी पत्रव्यवहार करुन आढावा घेतला. अखेर आज सहाव्या दिवशी यश मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *