कोपरगावातील खोका शॉप प्रश्न पुन्हा पालिकेच्या कोर्टात! नगर रचना सहाय्यक संचालकांबरोबरची बैठकही ठरली निष्फळ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
खोका शॉप प्रकरणी नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आकाश बागुल यांच्या दालनात बुधवारी (ता.24) बैठक झाली. यावेळी त्यांनी पालिकेच्या स्वमालकीच्या जागेत किंवा मोकळ्या भूखंडावर, सर्वांच्या सहमतीने निर्णय घेऊन खोका शॉप उभारावेत असा सल्ला देत हा प्रश्न पुन्हा पालिकेच्या कोर्टात टोलवून बैठक आवरती घेतली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संचालक बागुल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्थानिक पातळीवर याबाबत निर्णय घ्यावेत असे त्यांनी सांगितले. पालिकेकडे स्वतःच्या मालकीची केवळ बाजारतळ भागात जागा असून, त्यात केवळ 80 गाळे होवू शकतात. यापूर्वीच नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. आता पुन्हा सहाय्यक संचालकांनी सांगितल्याने हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

शहरातील धारणगाव रस्ता, स्वामी समर्थ मंदिर, पूनम थिएटरसमोर अशा सात ते आठ ठिकाणी खोका शॉपसाठी शिष्टमंडळाने परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. बैठकीत नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भाजप गटनेते रवींद्र पाठक, राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक जनार्दन कदम, कैलास जाधव, संदीप वर्पे, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, लक्ष्मण साबळे, प्रभाकर वाणी, विनायक गायकवाड यांच्यासह विस्थापित झालेले व्यापारी उपस्थित होते. काँग्रेसच्या कार्यालयासमोरील जागेत कुठलेही शॉप किंवा व्यापारी संकुल बांधू नये. अन्यथा पालिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असे काँग्रेसचे लक्ष्मण साबळे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

कोपरगाव शहरातील खोका शॉपसाठी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन चर्चा करू. सर्व समावेशक समितीची स्थापना करून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
– विजय वहाडणे (नगराध्यक्ष, कोपरगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *