रामपूरच्या उपसरपंचाविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील रामपूर गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पाऊण इंची अनधिकृत जलवाहिनी जोडून स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय पाण्याची चोरी केल्याप्रकरणी रामपूरच्या उपसरपंचाविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रामपूरच्या ग्रामसेवक प्रतिभा गोरक्ष भरसाकळ (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उपसरपंच राहुल रावसाहेब साबळे (वय 34) यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस रामपूर-सोनगाव रस्त्यालगत पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पाऊण इंच अनधिकृतपणे जलवाहिनी जोडणी केल्याचे 3 फेब्रुवारी, 2021 रोजी आढळले. साबळे यांनी स्वतःच्या घरात अनधिकृत नळजोडणी करून शासकीय पाण्याची चोरी केली आहे. राहुल साबळे यांनी मागील 30 वर्षांपासून गावाच्या पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत नळजोडणी करून शासकीय पाण्याची चोरी करीत आहेत. अशी लेखी तक्रार ग्रामस्थ मनीषा मोरे, रावसाहेब पठारे, नितीन खळदकर, दत्तात्रय नालकर, सुनील पठारे, दिलीप खळदकर, बाळासाहेब नालकर, शिवाजी नालकर, अनिल पठारे, किशोर पठारे, रवी पठारे, गवजी लोखंडे, केशव लोखंडे, भास्कर नालकर, गोकुळ शिंदे, सतीश भोसले, इंद्रभान भोसले, राजू मोरे यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली होती. नळ जोडणी बंद करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा उपोषण केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे घटनास्थळी ग्रामसेविकाच्या अधिपत्याखाली खोदकाम करुन, पंचनामा करण्यात आला. त्यानुसार उपसरपंच साबळे यांच्यावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *