संगमनेरच्या तरुणाचा मृतदेह भोजापूर धरणात आढळला

संगमनेरच्या तरुणाचा मृतदेह भोजापूर धरणात आढळला
हात बांधलेल्या स्थितीत आढळल्याने घातपाताचा संशय
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत तरंगताना शुक्रवारी (ता.28) आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून, तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, भोजापूर धरणाच्या पाण्यात म्हाळुंगी नदीमध्ये गुरुवारी (ता.27) रात्री 7 वाजेच्या सुमारास मृतदेह वाहून येत असल्याचे चापडगाव परिसरातील शेतकर्‍यांनी पाहिले. याबाबत तात्काळ वावी पोलिसांना माहिती देण्यात आली. तथापि रात्रीच्या वेळी या परिसरात पोहोचणे शक्य नसल्याने शुक्रवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत मृतदेह धरणातील मनेगावसह 16 गावे पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसपर्यंत तरंगत आला होता. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला असता त्याचे दोन्ही हात दोरीने बांधलेले आढळून आले. त्यामुळे घातपात असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.


सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांनी अकोले, संगमनेर व सिन्नर पोलीस ठाण्यात संपर्क साधून बेपत्ता तक्रारींबद्दल विचारणा केली. मृत तरुणाच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरुन तो संगमनेर येथील ज्ञानेश्वर माधव सोनवणे (वय 30, रा.कासारा दुमाला, अकोले रस्ता, संगमनेर) असल्याचे समजले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेची वार्ता संगमनेरात कळताच एकच खळबळ उडाली आहे.

मयत तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत आढळून आल्याने प्रथमदर्शनी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परंतु पोलिसांच्या सखोल तपासात खरे कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संगमनेरकरांचे वावी पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *