एकविरा फाऊंडेशनचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद ः थोरात तालुक्यातील गरजू विद्यार्थिनींना 100 सायकलचे मोफत वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्करोग तज्ज्ञ डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील 3 वर्षांत राबवलेले सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम हे अत्यंत कौतुकास्पद असून डॉ.जयश्री हिने स्वतःच्या पगारातून तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थिनींसाठी केलेले सायकल वाटप हे शिक्षण क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन देणारे असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील दत्त मंदिरासमोरील प्रांगणात एकविरा फाउंडेशनच्या वतीने संगमनेर तालुक्यातील गोरगरीब व गरजू विद्यार्थिनींना 100 सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर अ‍ॅड.माधव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, कांचन थोरात, दुर्गा तांबे, डॉ.हसमुख जैन, डॉ.जयश्री थोरात-जैन, शरयू देशमुख, गणपत सांगळे, सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, शांता खैरे, वंदना मुरकुटे, अजय फटांगरे, सुरेश थोरात, संजय थोरात, माणिक यादव, शिवाजी दिघे, मीनाक्षी थोरात आदी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.जयश्री थोरात यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्यापासून बचत केलेल्या आपल्या पगारातून तालुक्यातील गरजू व गरीब मुलींना 100 मोफत सायकलचे वाटप केले. तसेच डॉ.हसमुख जैन व डॉ.जयश्री थोरात यांच्या स्वागताप्रित्यर्थ जोर्वेकरांनी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून रांगोळी काढून अत्यंत दिमाखदार पद्धतीने नवदाम्पत्यांचे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा फुलांचा वर्षाव करत झालेल्या नवदाम्पत्याचे स्वागत आकर्षणाचा विषय ठरला.

एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील 3 वर्षांत आरोग्य उपक्रम, आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी, गणपती काळामध्ये मांगल्याचे निर्माल्य गोळा करणे, कोरोना संकटात सातत्याने मदत असे विविध उपक्रम राबवले हे अत्यंत कौतुकास्पद असून यापुढील काळातही महिला सक्षमीकरण अधिक काम करावे असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले. तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी-वस्तीवर जाण्याचा योग आला. याच माध्यमातूनच मला-मुलींची एक संघटना उभारण्याची कल्पना सूचली. एकत्र आलेल्या मुली ह्या वीर असतात म्हणून एकविरा हे नाव सूचवले. त्यानंतर एकविरा फाऊंडेशन हे नाव देत तालुक्यातील अनेक मुली एकत्र होऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. आज शिक्षणातून मुली कुटुंबाची व समाजाची प्रगती करू शकतात. म्हणून आपल्या तालुक्यातील गोरगरीब व गरजू मुलींना सायकल वाटप करण्याचा मी निर्धार केला. त्याला वडील बाळासाहेब थोरात, आई कांचन थोरात व पती डॉ.हसमुख जैन यांनी पाठिंबा दिला. यापुढील काळातही आपण गोरगरीब मुलींसाठी काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जोर्वे येथील दिव्यांग आदिवासी व गरीब कुटुंबियांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा.वृषाली साबळे, डॉ.सुरभी आसोपा, शिल्पा गुंजाळ, ज्योती थोरात, सुरभी मोरे, अहिल्या ओहोळ, शिवानी वाघ, ऐश्वर्या वाकचौरे, मिताली भडांगे, शिला पंजाबी, मयुरी थोरात, पूजा थोरात, जान्हवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *