गीतकार घोलपांचे सांस्कृतिक वारसा टिकवण्यात मोठे योगदान ः घोडके गोदातिरावरील कोपरगाव नगरीवर गीतकार वामन घोलपांनी केली रचना

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
प्राचिन काळापासून गोदातिरावर वसलेल्या कोपरगावला संत-महंतांची महती आहे. येथे असलेल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याचे भाग्य लागते. यासाठी कला आणि सांस्कृतिक कार्य मनापासून टिकवण्यात वामन घोलप यांच्या सारख्या कलाकारांचे मनस्वी योगदान समाधान देणारे असल्याचे गौरवोद्गार ‘सूर्यतेज’चे संस्थापक सुशांत घोडके यांनी काढले.

कोपरगाव नगरीवर गीतकार वामन घोलप यांनी रचना तयार करुन तिचे प्रजासत्ताक दिनी संत रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या रचनेचे प्रवास वर्णन करण्यासाठी गीतकार वामन घोलप यांनी सूर्यतेजचे संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेत संवाद साधला आहे.

याप्रसंगी गीतकार घोलप यांचे कौतुक करताना घोडके म्हणाले, पेशवाईच्या काळात बाजीराव पेशवे यांचे समोर शाहीर परशुराम यांनी कोपरगाव नगरीवर रचना सादर केली होती. शाहीर परशुरामच्या तोंडून कोपरगावची महती ऐकूण बाजीराव पेशवे यांनाही पुण्यधाम कोपरगाव नगरीत वास्तव्याचे आत्मिक समाधान मिळाले होते. त्यानंतर तब्बल दोन शतकानंतर कोपरगावचे सुंदर वर्णन वामन घोलप यांच्या गीतरचनेतून ऐकावयास मिळते. कोपरगावात निस्वार्थ सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी फार मोठा राजाश्रय मिळत नाही. चुकून राजाश्रय मिळालाच तरी त्यांचा अजेंडा आणि झेंडा मिरवावा लागतो.

कोपरगाव तालुक्यात नाट्य-सांस्कृतिक कार्यक्रमास व मनोरंजनाचे केंद्रही नाही. त्याकरिता कोणी किती प्रामाणिक प्रयत्न केले हा विषय आपला नसून स्वतंत्र विषय आहे. या सर्व बाबी कोपरगावच्या सांस्कृतिक चळवळीस उतरणीला नेणार्‍या असून कोणी या कामात लक्ष घालून काम करेल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच नटराजाच्या सेवेत तप्तर राहून कलासक्त, कलाप्रेमी एकत्र येऊन कोणी काय घालवलं यावर अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा आपल्या हातून जे शक्य आहे ते टिकवण्यासाठी प्रयत्न करुया. कोपरगावची खरी ओळख आणि सांस्कृतिक चळवळ तटस्थपणे गावकरी म्हणून काम करण्याची गरज आहे. कारण हे टिकवायलाही भाग्य लागते असा आशावाद घोडके यांनी व्यक्त केला.

टाळेबंदीच्या काळात घोलप यांनी कोपरगाव शहरावर शब्दरचना रचना केली आहे. त्याचे चित्रीकरण कोपरगावात झाले. चित्रपटातील गाण्यांसाठी लागणारी सर्व दर्जेदार तांत्रिक व तंत्रज्ञ मदत घेतली. कोपरगावातील जोपासलेल्या प्राचिन परंपरेचे जतन होवून त्याची ख्याती सर्वदूर व्हावी या भावनेतून ही गीतरचना तयार केली आहे. कलेचे उत्तम जाणकार म्हणून सुशांत घोडके यांची गीतकार वामन घोलप यांनी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी एक सर्वसामान्य रिक्षाचालक चित्रपट क्षेत्रात योगदान देतो हे पाहून त्यांनी त्यांचे कौतुक करत सन्मान केला आहे. केवळ कोपरगावच्या प्रेमापोटी स्वकष्टाचे हजारो रुपये एका सर्वसामान्य कलाप्रेमी रिक्षावाल्याने कोपरगाव शहराच्या गीतरचनेवर खर्च केले आहे. याबद्दल कोपरगाव शहरातील अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

वामन घोलप हे सर्वसामान्य रिक्षाचालक आहे. ते येसगाव येथे वास्तव्य करतात. दिव्यांग असूनही रिक्षा चालवत मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम चित्रपट कलेची हौस भागविण्यासाठी 14 वर्षांपासून खर्च करतात. त्यांनी मराठी चित्रपटात कथा, पटकथा आणि गीतरचना लिहिलेल्या आहेत. त्यापैकी कन्यारत्न, टोपीवाले कावळे, एकावर एक असे त्यांचे चित्रपट आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *