साईबाबा संस्थानची पत्रकारांवर फौजदारी कारवाई! पूर्वग्रह ठेवून तब्बल दोन महिन्यानंतर एबीपी माझाच्या टीमवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा…

नायक वृत्तसेवा, शिर्डी

साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्या पासूनच स्थानिक गावकरी आणि प्रसारमाध्यमांशी ‘पंगा’ घेवून मनमानी भूमिका घेणाऱ्या कान्हुराज बगाटे यांनी आज आपला खरा रंग दाखवला. दोन महिन्यांपूर्वी श्रीसाई मंदिराच्या परिसरात चित्रीकरण व वृत्तांकन केल्याप्रकरणी एबीपी माझाच्या दोघा प्रतिनिधींसह एका कॅमेरामनवर शासकीय कामात अडथळा आणणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या विलंबाने दाखल केलेल्या या गुन्ह्यामागे सूडाची भावना असल्याचा आरोप शिर्डी पत्रकार संघासह जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे. 

याबाबत साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2020 मध्ये राज्य शासनाच्या आदेशान्वये श्री साईबाबा मंदिर कोविड नियमांचे पालन करून दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावेळी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता समाधी मंदिराच्या मागील बाजूस गुरुस्थान मंदिराच्या समोर एबीपी माझा वाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी, नितीन ओझा व त्यांचा कॅमेरामन अशा तिघांनीही साईभक्तांच्या मुलाखती घेण्यास व त्याचे थेट प्रक्षेपण करण्यास सुरूवात केली. यावेळी तेथे मोठी गर्दी झाल्याचा आरोप ठाकरे यांनी फिर्यादीत केला आहे.
सदरची बाब लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुस्थान जवळ जाऊन एबीपी माझाच्या टीमला  वृत्तांकन थांबवण्यास सांगितले व तेथून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एबीपीच्या टीमने  विरोध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साईबाबा संस्थानने कोविडचे नियम पाळून दर्शन रांग सुरु केली होती. मात्र मुलाखत आणि थेट प्रक्षेपण या कार्यक्रमामुळे तेथे गर्दी झाल्याने साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याचे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर अचानक साक्षात्कार झाल्याने ठाकरे यांनी आज रोजी फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची माध्यम विरोधी भूमिका स्पष्ट करणारी आहे.
खरेतर कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पदभार घेतल्यापासूनच ते वादग्रस्त राहिले आहेत. सुरुवातीला ग्रामस्थां बरोबर त्यांनी विविध विषयांवर वाद घातले होते. त्यातून चर्चेत आलेले असताना मंदिरात येणाऱ्यांसाठी सभ्य वेशभूषेचा आदेश काढून ते पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. यादरम्यान राज्य शासनाने ठरवून दिलेल्या भाविक संख्येपेक्षा कितीतरी अधिक पटीने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी वृत्तांकन केले होते. त्यात एबीपी माझा वाहिनी आघाडीवर होती. या सर्व गोष्टीचा त्यांनी मनात राग धरला होता. त्यातच नुकत्याच गावकरी प्रवेशद्वारावरून झालेल्या वादाच्या वृत्तांकनावरुन त्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी पूर्वग्रह ठेवून एबीपी माझाच्या दोघा पत्रकारांसह एका कॅमेरामन वर गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात संताप निर्माण झाला असून बगाटे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *