‘पुणे-नाशिक’ महामार्गावर आता बिबट्यांसाठी ‘भुयारी मार्ग’! वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्यात राबविला जाणारा पहिलाच पथदर्शी प्रयोग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपूर्‍या कामांमुळे सुरु झाल्यापासून अवघ्या चार वर्षात अनेक निष्पापांचे बळी घेणारा ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्ग आता बिबट्यांच्या संरक्षण उपक्रमांमुळे चर्चेत येणार आहे. एकीकडे मानवी चुकांमुळेे या महामार्गावर नियमित अपघातांची श्रृंखला अव्याहत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असताना वन्यजीव विभागाची भूतदया मात्र ठळकपणे समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत अनेक मानवीय बळी घेणार्‍या या महामार्गाने सह्याद्रीच्या कुशीतील दमदार श्वापदांचेही जीव घेतले आहेत. या घटनांतून मानवी जीव सुरक्षित करायला कोणीही पुढे आले नाही, मात्र वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता वन्यजीव विभागाकडून ठोस आराखडा मांडण्यात आला असून राज्यातील बहुधा हा पहिलाच पथदर्शी प्रयोग संगमनेर तालुक्यात राबविला जाणार आहे.

दोन महानगरांना जोडणारा महामार्ग म्हणून ‘पुणे-नाशिक’ या राष्ट्रीय महामार्गाला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणार्‍या राज्यातील प्रमुख महामार्गांच्या पंक्तित असलेल्या या रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने धावतात. संगमनेर शहराच्या अगदी मध्यातून जाणार्‍या या महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम जानेवारी 2017 मध्ये 70 टक्के पूर्ण झाले आणि नियमानुसार टोलसह हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. त्यातून संगमनेर शहरातील वाहतुकीचा बोजा कमी होण्यासोबतच या दोन महानगरांदरम्यान प्रवास करणार्‍यांचा वेळही कमी झाला. मात्र नंतरच्या काळात शिल्लक राहिलेल्या 30 टक्के कामांकडे ठेकेदार कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचा परिपाक सुरु झाल्यापासूनच या महामार्गावर अपघांताची श्रृंखला सुरु झाली. गेल्या चार वर्षात या महामार्गावरील अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले तर अनेकांना गंभीर स्वरुपाच्या दुखापतीही झाल्या.

दळणवळणाची व्यापक संसाधने राष्ट्राच्या आणि राज्यांच्या विकासाची प्रमुख माध्यमे असतात, या तत्त्वाने अपघाती ठरत गेला तरीही या महामार्गाचे महत्त्व तस्सूभरही कमी झाले नाही. संगमनेर तालुका तसा दुष्काळी, डोंगरांच्या बेचक्यातील दरीत वसलेल्या या तालुक्यात जंगली जीवांचाही मोठा वावर असतो. मुळा व प्रवरा या मोठ्या नद्यांच्या खोर्‍यातील गर्द राने आणि त्यात नटलेल्या वनसंपदेमुळे संगमनेर-अकोल्याचा भाग वन्यजीवांच्या वास्तव्याचा परिसर म्हणून अवघ्या राज्याला परिचयाचा आहे. अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारन्य म्हणजे तर अशा असंख्य वन्यजीवांचे नंदनवनच. मात्र गेल्या काही वर्षात या भागातील रानडुकरांनी संघटीत टोळ्या केल्याने कधीकाळी या संपूर्ण भूभागावर अधिराज्य गाजवणार्‍या बिबट्यांना आपला पारंपरिक परिसर सोडून पूर्वेकडील भागात परागंदा व्हावे लागले.

अभयारण्यात मिळणारी मुबलक शिकार आणि पाणी याची मात्र वाणवा जाणवू लागल्याने बिबट्यासारखी श्वापदे थेट मानवी वस्त्यांकडे चालून जाण्याचे प्रकारही गेल्या काही वर्षात सारखे वाढत आहेत. अकोल्यातील अभरयारण्याच्या सीमा ओलांडून थेट संगमनेर तालुक्यात प्रवेश करणार्‍या या श्वापदांकडून शेतकर्‍यांची पाळीव जनावरे पळविण्यासोबतच कधीमधी त्याला अडथळा ठरणार्‍या मानवावरही हल्ले करण्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. त्यासोबतच शिकार आणि पाण्याच्या शोधात सतत मार्गक्रमण करणारी ही श्वापदे अनेकदा आपल्या प्रवासादरम्यान रस्त्यावर येत असल्याने वाहनांच्या धडका लागून त्यात मृत्यूमुखी पडण्याचे असंख्य प्रकारही संगमनेर तालुक्यात घडले आहेत. गेल्या चार वर्षात एकट्या पुणे-नाशिक महामार्गावर दोन डझनहून अधिक बिबटे अपघातात ठार झाले आहेत, यावरुन ही गोष्ट अधोरेखीत होते.

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात बिबटे ठार होण्याचे प्रमाण अधिक असल्याने याची थेट दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याच्या अप्पर मुख्य वनसंरक्षकांनी घेतली आणि या महामार्गावरील बिबट्यांचा अपघाती मृत्यू टाळण्यासाठी ठोस उपाय योजनांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संगमनेरच्या वन्यजीव विभागाला बजावला. त्यानुसार शुक्रवारी (ता.29) केंद्र सरकारचे अप्पर मुख्य वनसंरक्षक अंबाडे, नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक अंजनकर, संगमनेर विभागाचे उपविभागीय वनसंरक्षक गणेश ढोरे, भाग एकचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे व घारगाव वन परिमंडलाचे अधिकारी रामदास थेटे यांनी संगमनेर तालुक्यातील कर्‍हेघाट ते आळेखिंड या पन्नास किलोमीटरच्या क्षेत्रातील बिबट्यांसह वन्यजीवांचे सर्वाधिक बळी गेलेली ठिकाणी चिन्हीत केली असून वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी राज्यातील बहुधा पहिलाच पथदर्शी प्रस्ताव सादर केला आहे.

या प्रस्तावानुसार तालुक्यातील कर्‍हेघाट, एकलघाट, ब्राह्मणज्योती (आंबी खालसा फाटा) व माळवाडी ही चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या चारही ठिकाणी वन्यजीवांना वाहनांचा सामना केल्याशिवाय रस्ता ओलांडता यावा यासाठी भूयारी मार्ग करण्याची संकल्पना समोर ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच भुयाराच्या दोन्ही बाजूला पाणवठेही निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी थेट महामार्गावर येण्याचे प्राण्यांचे प्रमाण कमी होईल व त्यांचा जीव वाचवण्यासाठी मोठी मदत मिळेल अशी वन विभागाला अपेक्षा आहे. याशिवाय तालुक्याच्या संपूर्ण हद्दीत ज्या ठिकाणाहून बिबटे अथवा अन्य वन्यजीव रस्ता ओलांडण्याची शक्यता आहे, तेथे ‘बिबटे प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा’ असे सूचना फलक लावले जाणार आहेत. ही संकल्पना लवकरात लवकर राबविण्याचा विचार असून त्यातून वन्यजीवांच्या अपघातांवर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास यावेळी संगमनेरचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांनी व्यक्त केला. वन्य श्वापदांसाठी असा प्रयोग राबविणारा संगमनेर तालुका कदाचित राज्यात पहिलाच ठरणार असून हा प्रयोग देशासाठीही पथदर्शी ठरेल.


जंगली वातावरणातून अचानक रस्त्यावर आल्याने वाहनांची धडक लागून बिबटे ठार होण्याच्या अनेक घटना संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावर घडल्या आहेत. या घटनांची गंभीर दखल घेत केंद्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाने त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता कर्‍हेघाट, एकलघाट, ब्राह्मण ज्योती (आंबीखालसा फाटा) आणि माळवाडी या चार ठिकाणी बिबट्यांसाठी भुयारी मार्ग आणि पाणवठे तसेच महामार्गावर ठिकठिकाणी ‘बिबटे प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा’ असे सूचना फलक लावले जाणार आहेत. असा प्रयोग करणारा संगमनेर तालुका त्यामुळे राज्यात बहुधा पहिलाच तालुका ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *