कोपरगाव पालिकेचे अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ः अ‍ॅड.पोळ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहराला नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले असून राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असताना कोपरगाव नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण थाटू लागले आहेत. मात्र या अनधिकृत अतिक्रमणाकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी कोपरगाव पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण करून अनेकांनी आपली दुकाने थाटली होती. मात्र वाहतुकीला अडथळा होतो म्हणून ही अतिक्रमणे काढून टाकली. त्याकरिता पालिकेला मोठी कसरत करावी लागली. त्याचप्रमाणे ही अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल, पोलीस प्रशासनावर मोठा खर्च झाला. या शेकडो दुकानदारांना विस्थापित व्हावे लागले म्हणून अनेक राजकीय नेत्यांना याचा राजकीय फटका देखील बसला. दहा वर्षांत या विस्थापित टपरीधारकांना पुन्हा जागा मिळावी म्हणून मोठा संघर्ष करावा लागला. मात्र अद्याप या विस्थापित टपरीधारकांचा खोका शॉपचा प्रश्न सुटला नाही. असे असताना सर्वच राजकीय पक्षांना पुढील वर्षात होणार्‍या पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकी पूर्वी राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची धूळवड उठवली असल्याचे जाणवत असून नवीन अनधिकृत अतिक्रमणाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे भविष्यात पालिकेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे अ‍ॅड.पोळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *