खंदरमाळ शिवारात खून केलेल्या अवस्थेत पुरूषाचा मृतदेह आढळला! दोघे संशयित ताब्यात; घारगाव पोलिसांचा वरिष्ठांच्या सूचनांनुसार सखोल तपास सुरू

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभाग पुन्हा एकदा हादरला आहे. येथील आंबीखालसा फाट्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंदरमाळवाडी शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यावर एका अनोळखी पुरूषाचा खून केलेल्या अवस्थेत बुधवारी (ता.27) सकाळी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या सूचनांनुसार सखोल तपास सुरू केला आहे. यानंतरच मृतदेहाची ओळख, खूनाचे कारण आणि आरोपी या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आंबीखालसा फाट्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंदरमाळवाडी शिवारातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे तोंड पूर्णपणे रक्ताने माखलेले होते तर डोक्यालाही गंभीर इजा झाल्याचे दिसत होते. बुधवारी सकाळी काही नागरिकांच्या ही घटना निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली.

माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेची पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेरातील कुटीर रूग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या सूचनांनुसार सखोल तपास सुरू केला आहे. यामधूनच मृतदेहाची ओळख, खूनाचे कारण आणि आरोपी या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

टाळेबंदी शिथील झाल्यानंतर आणि कोरोनाचे संकटातून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. एकीकडे बिबट्यांची दहशत तर दुसरीकडे चोरट्यांची दहशत. यामुळे नागरिक आधीच भयभीत असताना ही खूनाची घटना घडल्याने पोलिसांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *