‘स्वदेश’ची मकर संक्रांत विविध उपक्रमांनी साजरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील स्वदेश कला उत्सवची मकर संक्रांत वेशभूषा, उखाणे, जादूगार ए.सी.सरकार यांसह विविध उपक्रमांनी मोठ्या आनंदात साजरी झाली.

तत्पूर्वी स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने 12 ते 14 जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचीही सांगता मकर संक्रांतीच्या दिवशी झाली. या उपक्रमांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान, दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी शिबिर, हळदी-कुंकू, तिळगूळ व वाण वाटप, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि जादूगार ए.सी. सरकार यांचे जादुई प्रयोग होते. वेशभूषा स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक यशस्विनी आदित्य घाडगे, द्वितीय कोमल संतोष नाईकवाडी, तृतीय ईश्वरी खताळ व उत्तेजनार्थ काव्य औटी यांना आरोही मुळे यांनी बक्षिसाचे वितरण केले. पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक मंदा रावसाहेब डेरे, द्वितीय सुनीता दत्तात्रय कासार, तृतीय आकांक्षा घुले व उत्तेजनार्थ शिवानी रमेश क्षीरसागर. उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता ओमप्रकाश जाजू, द्वितीय वनिता बाळासाहेब काळे, तृतीय गोदावरी सहदेव शिंदे व उत्तेजनार्थ दीपाली वाकचौरे, सविता मंडलिक, विमल वाकचौरे.

सर्व स्पर्धांचे परीक्षण कला प्रशिक्षक रक्षा जाजू, योगा प्रशिक्षक सारिका परदेशी, प्रा.जितेंद्र पाटील, नृत्य शिक्षक कुलदीप कागडे यांनी केले. याप्रसंगी स्वच्छतादूत आदित्य घाडगे याला स्वच्छता कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तर विश्वकन्या साहेबराव काळे हिची हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीच्या विशेष सेवा निवडीसाठी निवड झाल्याने तिचाही सन्मान करण्यात आला. दरम्यान, कारखान्याचे संचालक अनिल काळे यांच्या परिवाराने स्वदेश संस्थेच्या सामाजिक उपक्रमांसाठी 11 हजार रुपयांची देणगी दिली. प्रास्ताविक स्वदेश कला उत्सवाचे मार्गदर्शक बाळासाहेब देशमाने यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता कासार यांनी केले. यावेळी स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश महिला मंच, धांदरफळचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व युवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *