श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाचा नेवाशात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, नेवासा
जगातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माण कार्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा शुक्रवारी (ता.15) भास्करगिरी बाबांच्या हस्ते नेवासा येथून शुभारंभ करण्यात आला. अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल असे गौरवोद्गार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना काढले.

नेवासा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात सकाळी 11.30 वाजता भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार संभाजी फाटके, विश्व हिंदू परिषदेचे मकरंद ढवळे, अनंत नळकांडे उपस्थित होते. समवेत संकलन अभियानातील युवा कार्यकर्ते स्वप्नील पोतदार यांनी उपस्थित संत महंतांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तर संघ प्रचारक शुभम वेळेकर यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे गीत सादर केले.

प्रारंभी प्रभू श्री रामचंद्र, भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संकलन निधी पुस्तकाचे पूजन करण्यात आले. यावेळी दर्शन गणेश परदेशी व सुयोग योगेश काळे या बालकांनी साठवलेले खाऊचे पैसे निधीच्या रूपाने भास्करगिरी बाबांकडे सुपूर्द केले तर माजी आमदार फाटके यांच्या परिवाराकडून 2 लाख 55 हजारांचा निधीही देण्यात आला. शेवटी या पवित्र कार्यासाठी प्रत्येकी दहा रुपये देऊन या कार्यात सर्वांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही भास्करगिरी महाराजांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *