महिला संरक्षण समितीला संरक्षणाची गरज ः अ‍ॅड.पोळ

महिला संरक्षण समितीला संरक्षणाची गरज ः अ‍ॅड.पोळ
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
केंद्र शासनाने सन 2005 मध्ये महिलांचा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण करणारा कायदा निर्माण केला आणि या कायद्याच्या तरतुदीनुसार प्रत्येक तालुक्यात महिला सरंक्षण समिती नेमून सुरक्षा अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. मात्र कोपरगाव तालुक्यातील महिला संरक्षण समितीचा कारभार ‘असून अडचण नसून खोळंबा’ असा झाला आहे. त्यामुळे या समितीला संरक्षण मिळावे, अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


प्रसिद्धी पत्रकात अ‍ॅड.पोळ पुढे म्हणाले, शासनाने सदर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कोपरगाव पंचायत समिती मार्फत सुरक्षा अधिकार्‍यांची व संरक्षण अधिकार्‍यांची नेमणूक केली. मात्र हा कायदा व अधिकारी निव्वळ शोभेच्या असल्याचे दिसून येते. पीडित महिलेने एखादी तक्रार दाखल केल्यानंतर तीन दिवसांत समोरच्या व्यक्तीला बोलावून पती-पत्नी व नातेवाईक यांच्यात समेट घडविण्यासाठी प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे कमीत कमी दिवसात निकाल देऊन पीडित महिलेला न्याय देणे अशी या कायद्यात तरतूद आहे. मात्र कोपरगाव येथील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीकडे महिनोमहिने लक्ष दिले जात नाही. त्याचप्रमाणे अशी काही तक्रार दाखल आहे किंवा नाही याची माहिती सुरक्षा अधिकार्‍यांना नसते. तर एखाद्या पीडित महिलेने तक्रारीचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला तरी सामनेवाले यांना नोटिसा बजावण्याकरिता पैशांची मागणी केली जाते. तर कधी कधी सामनेवाले हजर होऊन जबाब नोंदविल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून सामनेवाल्यांशी अर्थपूर्ण तडजोडीतून सहकार्य केले जाते. तर नोटिसा पाठवणे, कागदपत्रे यांच्यावर शासन खर्च करत असताना पीडित महिलांना खर्चाची मागणी केली जाते. तसेच तडजोड न झालेली प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यासाठी पीडित महिलांना कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. अशा प्रसंगी संबंधित अधिकारी भेटतीलच याची खात्री कोणतीच पीडित महिला देऊ शकत नाही, अशा अनेक तक्रारी महिलांनी केल्या आहेत. त्यामुळे येथील महिला संरक्षण समितीला आता खर्‍या अर्थाने कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक आहे असे या पत्रकात अ‍ॅड.पोळ म्हंटले आहे. सदर महिला समितीच्या कारभारात सुधारणा न झाल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *