पोलीस आणि अन्न व भेसळ विभागाची गुटखा तस्करांवर कारवाई! इंदिरानगरमधील दोघे तर घुलेवाडीतील एकासह सुमारे पाच लाखांचा गुटखा व दोन वाहने ताब्यात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार कारवाया होवूनही जिल्ह्यातील गुटखा तस्कर माघार घ्यायला तयार नसल्याचे चित्र संगमनेरात दिसत आहे. आज मंगळवारी सकाळीही पोलीस व अन्न आणि भेसळ विभागाने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे पाच लाखांचा गुटखा व दोन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणात तालुक्यातील तिघा गुटखा तस्करांची नावे समोर आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अनेकवेळा गुटखा तस्करीत कारवाई झालेल्यासह पोलिसांनी यावेळी पहिल्यांदाच दोघा भावंडांवर कारवाई केल्याने गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे आगार बनत असलेल्या संगमनेरात वारंवार गुटखा तस्करांविरोधात कारवाया झाल्या आहेत. मात्र प्रत्येकवेळी वरवरचा तपास झाल्याने आजवर तालुक्यातील गुटखा तस्करीचे जाळे समूळ नष्ट करण्यात ना पोलिसांचा यश मिळाले, ना अन्न व भेसळ विभागाला. त्यामुळे प्रत्येकवेळी होणार्‍या कारवायांतून गुटख्याच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या पालकांना काहीसा दिलासा मिळत गेला खरा, मात्र तो क्षणिकच ठरल्याचेही दरवेळी सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील अन्न व भेसळ विभागाचे तर काही सांगायलाच नको. हा विभाग जिल्ह्यात असूनही केवळ बोंब उठल्यावरच एखाद् दुसरी थातूरमातूर कारवाई करण्यापलिकडे या विभागाचे अस्तित्त्वच दिसत नसल्याने या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच संशयाच्या वलयात वावरत असतात. मात्र गुटखा तस्करीतून महिन्याकाठी जिल्ह्यात कोट्यावधीचे अर्थकारण फिरत असल्याने या विभागाला नागरी संशयापेक्षा त्याचे मोल अधिक असल्याचेच वारंवार दिसून आले आहे.

आज (ता.12) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याजवळ सापळा लावला होता. यावेळी मिळालेल्या माहितीनुसारची मारुती ओमीनी (क्र.एम.एच.17/बी.व्ही.9057) हे वाहन दृष्टीस पडताच त्याला थांबण्याचा इशारा करण्यात आला. त्या वाहनाची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे पोलिसांना आढळल्यानंतर त्या वाहनातील दोघांनाही ताब्यात घेवून तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ केलेल्या कारवाईत शहरातील इंदिरानगर परिसरात राहणार्‍या संजय व अक्षय भागवत या दोघा भावंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून हिरा कंपनीच्या पानमसाल्याची व सुगंधी तंबाखूची प्रत्येकी 19 पोती, तसेच आर.एम.डी. आणि विमल पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण 3 लाख 21 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा तस्करीसाठी वापरण्यात आलेली मारुती ओमीनी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भा.दं.वि. कलम 188,272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59, 26 (2) (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी कारवाई घुलेवाडीतील नामचीन गुटखा तस्कर संजय लुंकड याच्या विरोधात अन्न व भेसळ विभागाच्या कर्मचार्‍यांनी केली आहे. नेहमीप्रमाणे सदर प्रकरणाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया कासवगतीने सुरू असून जोपर्यंत संपूर्ण कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत एक शब्दही बोलणार नाही असे ‘तत्त्व’ या विभागाचे आयुक्त किशोर गोरे यांनी यावेळीही तंतोतंत जोपासले आहे. मात्र दैनिक नायकच्या हाती लागलेल्या माहितीनुसार सदरची कारवाई देखील मोठी असून लुंकड याच्याकडून हिरा गुटख्याचे 12 पोते व अन्य काही कंपन्यांचा गुटखा व एक छोटा टेम्पो (क्र.एम.एच.17/बी.वाय.3851) ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदरची कारवाई देखील काही लाखांत असून प्रत्यक्षात गुन्ह्यात त्यातील किती मुद्देमाल येतो हे अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतरच समोर येईल. एकंदरीत पोलीस आणि अन्न व भेसळ विभागाने संगमनेरात आज केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे पाच लाखांहून अधिक मूल्याचा गुटखा आणि दोन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या कावाईने शहर व तालुक्यातील छोट्या व मोठ्या गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वास्तविक श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी एकलहरे येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा घातल्यानंतर जिल्ह्यातील मोठे गुटखा तस्कर समोर आले होते. त्या कारवाईत व नंतरही अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने त्या प्रकरणाचा तपास काढून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तो शिर्डीचे उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविला होता. त्यांनी थेट हिरा गुटख्याचा उत्पादक व पुरवठादार अशा दोहींना गुन्ह्यात घेवून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. मात्र नंतरच्या काळात ते प्रकरण बासनात गेल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात काहीकाळ गुटख्याची टंचाई निर्माण झाली होती, मात्र ती क्षणिक होती. पोलिसांनी गुटख्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या, मात्र गुटखा तस्करी थांबवण्याची, त्याचे उत्पादन, साठा, वितरण व विक्री पूर्णतः रोखण्याची संपूर्ण आणि थेट जबाबदारी असलेला अन्न व भेसळ विभाग मात्र त्यानंतरही सुस्तच होता. त्यामुळे या विभागाविषयी अधिक काही सांगण्याची गरज शिल्लक रहात नाही.


अन्न व भेसळ विभागाचे आयुक्त किशोर गोरे यांच्याकडून गुटख्यावरील कारवाईची माहिती देण्यास नेहमीच टाळाटाळ व विलंब झाल्याचे अनुभव दैनिक नायकने यापूर्वीही घेतले आहेत. आजही घुलेवाडीतील संजय लुंकड या गुटखा तस्करावर कारवाई झाल्याची माहिती मिळताच त्याबाबत आयुक्त गोरे यांच्याशी संपर्क साधला असता ‘गुन्हा दाखल होण्यास अजून दोन-अडीच तास लागतील, त्यानंतर सांगतो’ असे साचेबद्ध उत्तर देत त्यांनी आपली मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *