साईबाबांपुढे बाकीच्या सर्व गोष्टी क्षुल्लक आहेत ः सोनू सूद मुंबई पालिकेच्या कारवाईबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला दिले उत्तर

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घ्यायला आलो आहे. त्यांच्यापुढे बाकीच्या सर्व गोष्टी क्षुल्लक आहेत. अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेता सोनू सूद याने दिली. सूद याने मुंबईत जुहू येथील निवासी इमारतीत विनापरवाना हॉटेल सुरू केल्याची तक्रार मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे केली आहे. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सूद याने ही प्रतिक्रिया दिली.

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद शुक्रवारी (ता.8) शिर्डीत आला होता. त्याने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांनी त्याला या विषयावर बोलते केले असता त्याने यावर अधिक भाष्य करणे टाळले. यापूर्वीही सूद याने आपल्यावर लावलेले आरोप फेटाळले होते. त्याच्याविरूद्ध ही कारवाई आकसाने केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सूद मात्र याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसून त्याने आज हा मुद्दा क्षुल्लक असून त्यावर अधिक बोलणेही टाळले आहे.

दरम्यान, शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर सूद याने कोपरगावला भेट दिली. कोपरगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सूदतर्फे शंभर स्मार्टफोन भेट देण्यात आले आहेत. करोना काळात गरीब विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद पडू नये, यासाठी त्याने हे स्मार्टफोन दिले आहेत. गरज पडली तर आणखी फोन देण्याची तयारीही त्याने दर्शविली. कोपरगावमधील एम. के. आढाव विद्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी सूद याचा पालिकेतर्फे ‘करोना योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला. आपण अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी कोपरगावलाच निघालो होतो. आपला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नंबर लागला होता. मात्र, नागपूर मार्गे कोपरगावला येत असताना नागपूरमध्येही नंबर लागल्याचे कळाले, त्यामुळे कोपरगावला येणे टळले, अशी आठवणही सूद याने यावेळी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *