दुष्काळीभागात निळवंड्याचे पाणी फिरेल तो दिवस जीवनातील सर्वोच्च असेल – महसूलमंत्री थोरात संगमनेर फेस्टिव्हलच्या डिजीटल मंचावरील मुलाखतीतून उलगडला तालुक्याच्या विकासाचा प्लॅन


संगमनेर, प्रतिनिधी
गांधीजींच्या विचारांचा जागर करणार्‍या आजोबांपासून घरात काँग्रेसची विचारधारा रुजली. पक्षाशी सतत निष्ठा ठेवून काम करीत राहील्याने आमदारकीपासून अगदी प्रदेशाध्यक्षापर्यंतचा प्रवास घडला, मात्र त्यापेक्षा या सगळ्या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वाला नेता आले याचे मनस्वी समाधान लाभले. ज्या दिवशी धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळीभागातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचेल तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा ठरेल असे स्पष्ट प्रतिपादन अखिलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.


येथील राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने यंदा संगमनेर फेस्टीव्हलच्या डिजीटल रंगमंचावर नामदार बाळासाहेब थोरात यांची चतुरस्त्र मुलाखत घेण्यात आली. रचना मालपाणी व डॉ.संतोष खेडलेकर यांनी विविध अराजकीय प्रश्‍नातून त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेतला. जवळपास तासभर चाललेल्या या मुलाखतीतून नामदार थोरात यांच्या जीवनातील विविध पैलूंवर झोत पडला.


बालपणापासून गांधीजींच्या विचारांची शिकवण मिळाल्याने आपण कायम काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहील्याचे त्यांनी सांगीतले. लोकाग्रहास्तव 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि संगमनेरकर जनतेच्या भरभरुन प्रेमाच्यापोटी त्यात घवघवीत यशही संपादन झाले. तेव्हापासून तालुक्यातील जनतेचे प्रेम सातत्याने मिळाल्याने सलग आठवेळा प्रचंड माताधिक्क्याने विजय प्राप्त झाला. या काळात पक्षाने राज्याची जबाबदारीही सोपविल्याने चांगले काम करण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. विविध विकास योजना तालुक्यातील प्रत्येक वाडी व वस्तीपर्यंत नेण्याचे सुरुवातीपासून धोरण ठेवल्याने या काळात तालुक्यातील नागरिकांची कामे करता आली.


जिल्ह्यातील प्रत्येक चळवळीत अग्रभागी असलेल्या संगमनेर शहराचा कायापालट करण्यासाठीही अविश्रांत परिश्रम घेतल्याचे त्यांनी विविध दाखल्यांसह सांगीतले. अनियंत्रित वाहतुक व्यवस्थेसाठी बायपासची निर्मिती, प्रशासकीय भवन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, संगमनेर न्यायालयांचे संकुल अशा शहराचे वैभव वाढवणार्‍या वास्तुंसह प्रवरा नदीच्या जून्या पुलावरील वाहतुक समस्या सोडवण्यासाठी समांतर पुल यासारख्या कामांसाठी विविध योजनांतून निधी आणल्याचे त्यांनी सांगीतले.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर तालुक्यातील सहकाराचा वेलू गगनावर पोहोचला आहे. तालुक्यातील विविध सहकारी संस्था राज्यात आदर्श ठरतील असं काम करीत आहेत. शिक्षण, सहकार, कृषी आणि अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रात संगमनेर तालुका राज्यासाठी मॉडेल ठरेल इतके काम येथे झाले आहे. पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीतून राज्यातही मोठे काम उभे राहीले, महसुल खात्यात विविध प्रयोग करुन सामान्य शेतकर्‍यांचे काम अधिक सहज करण्याचा सतत प्रयत्न केला. त्यातून राज्यात संगमनेर तालुक्याचा लौकिकही वाढल्याचे त्यांनी सांगीतले. गेल्या 35 वर्षांच्या राजकीय प्रवासात विविध क्षेत्रातील राजकारण विरहित मित्रांचाही मोठा संच जमवता आला याचा आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगीतले.


पक्षीय संरचनेवर भाष्य करताना त्यांनी पक्षाध्यक्षा सोनीया गांधी व राहुल गांधी यांनी नेहमीच आपल्यावर विश्‍वास व्यक्त केल्याचा दाखला त्यांनी दिला. पक्षाने गुजरात निवडणूकीतील मोठी जबाबदारी आपल्यावर सोपविली होती, त्याला न्याय देतांना घेतलेल्या परिश्रमांना तेथील निवडणूक निकालातून लोकमान्यता मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. या निवडणूकीतील परिश्रमांचे फळ म्हणून नंतरच्या काळात हिमाचल प्रदेशच्या निरीक्षकपदी व नंतर राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यपदी निवड झाली. पक्ष अडचणीच्या काळात असतांना पक्ष नेतृत्त्वाने राज्याच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवली. जनतेच्या आशीर्वादाने तेथेही चांगले काम घडल्याने अनपेक्षित वाटणारे निकाल आपल्या सर्वांसमोर आल्याचे त्यांनी सांगीतले. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असेच काम आजवर केले आहे व यापुढेही करीत राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.


गेल्या अनेक दशकांपासून केवळ चर्चेत असणार्‍या निळवंडे धरणाच्या कामाला गती देण्याचे व ते पूर्णत्त्वास नेण्याचे कार्य आपल्या हातून घडले हा जीवनातील सर्वात मोठा प्रसंग आहे. पुढील दोन वर्षात या धरणाच्या कालव्यांची कामे तडीस नेवून दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होईल तो दिवस आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल असे भावोद्गारही त्यांनी व्यक्त केले. प्रवासी, चाकरमाने, शेतकरी व व्यापारी अशा सगळ्यांच्याच जीवनाला कलाटणी देणार्‍या नाशिक-पुणे या रेल्वेमार्गासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होवून ते विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी संगमनेर तालुक्याचे राजकारण सुसंस्कृत असल्याने येथील राजकारण व्यक्ती द्वेषावर चालत नाही, असेच वातावरण कायम ठेवून संगमनेर तालुका विकास कामांच्या बाबतीत राज्यात अग्रभागी रहावा यासाठी काम करीत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना शेवटी सांगीतले.


संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी यांनी आपल्या प्रास्तविकात फेस्टिव्हलचा गेल्या बारा वर्षांचा आढावा घेतला. या कालावधीत साहित्य, कला, नृत्य, नाट्य, संगीत, कीर्तन, व्याख्यान व प्रबोधन अशा सर्वच क्षेत्राला स्पर्श करणारे 85 दर्जेदार कार्यक्रम सादर झाल्याचे त्यांनी सांगीतले. यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यास प्रतिबंध असल्याने यंदाचा संगमनेर फेस्टिव्हल डिजीटल माध्यमाद्वारे सादर होत असल्याचे ते म्हणाले. फेस्टिव्हलचे तिसरे पुष्प गुंफतांना राज्यातील बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व, राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रकट मुलाखत सादर होत आहे, त्यांच्या देदीप्यमान कारकीर्दीतून अनेकांना प्रेरणा मिळेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *