‘ड्रायरन’च्या शुभारंभासह नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रुग्णसंख्याही घटली!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड लस टप्प्यात असल्याने आणि ती देखील भारतीय नागरिकांना मोफत मिळणार असल्याने देशात उत्सवाहाचे वातावरण असतांना नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्यात आणखी काहीशी भर घातली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून एकमेकांशी स्पर्धा करणार्‍या कोविड बाधितांच्या आकड्यांनी 2021 चे स्वागत करतांना तालुक्याची दैनिक रुग्णसंख्या एकेरीत आणली आहे. त्यामुळे नववर्षाचा पहिला दिवस उत्साह वाढवणारा तर दुसरा दिवस मोफत मिळणार्‍या लसीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला आहे.

गेल्या एप्रिलपासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण वर्षाखेरीस बर्‍याचअंशीे नियंत्रणात आले आहे. पुण्यातील सिरम कंपनीकडून निर्मित लसही तयार झाल्याने व प्रत्यक्ष लसीकरणासाठी ती सज्ज असल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच केंद्रीय आरोग्य मत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सर्व भारतीय नागरिकांना कोविडवरील लस मोफत देण्याची घोषणा केल्याने सध्या देशात आनंदाचे भरते आल्यागत स्थिती आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी या आनंदवार्तेसह कोविड बाधितांच्या दररोजच्या संख्येतही मोठी घट होवून शुक्रवारी (ता.1) शहरातील अवघ्या दोघांसह एकूण सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे लसीची निर्मिती, मोफत लसीकरण आणि खालावत जावून एकेरीवर आलेली रुग्णसंख्या यामुळे देशभरात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्यासोबतच सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविडशिल्ड या लसीला आपत्कालीन स्थितीत वापराला मंजूरी देतांनाच केंद्राकडून देशभरात आज लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रायरन’ (सराव फेरी) सुरु करण्यात आली आहे. त्यात राज्यातील पुणे, नागपूर, नंदूरबार व जालना जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे ही लस लवकरच नागरिकांना उपलब्ध होवून देशातून कोविडचा नायनाट होईल असे आनंददायी चित्र दिसू लागले आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील एकूण सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील शहरातील गणेशनगर परिसरातील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि शिवाजीनगरमधील 43 वर्षीय तरुणासह आश्वी खुर्द येथील 15 वर्षीय बालिका, धांदरफळ बु. येथील 30 वर्षीय महिला, निमज येथील 47 वर्षीय महिला व शेडगाव येथील 41 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. शुक्रवारी तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत सहा जणांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 6 हजार 20 वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *