भंडारदरा परिसरात ‘टेन्ट हाऊस’मध्ये अवैध दारू विक्री

नायक वृत्तसेवा, अकोले
भंडारदरा परिसरात पर्यटनाच्या नावाखाली अवैध दारूचा गोरखगधंदा चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात पर्यटनासाठी उभारण्यात आलेल्या ‘टेन्ट हाऊस’मध्ये हा प्रकार सर्रास चालू असून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गस्त घालत असताना चक्क एक शिक्षकच अवैध दारूची वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एक बलेनो कारसह अंदाजे दहा हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे.

भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्र परिसरात पर्यटन विकासासाठी सरकारने सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा दृष्टीकोन ठेवून टेन्ट हाऊस ही संकल्पना सुरू केली आहे. ज्यामुळे भंडारदरा परिसरात आलेल्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येईल आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा रोजी रोटीचा प्रश्नही मिटेल. येथे येणार्‍या पर्यटकांचा टेन्ट हाऊस ह्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली. आता कोरोनाच्या गडद छायेतून बाहेर पडून भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाय नव्याने रूजवात करत असताना एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत पर्यटन व्यवसायाला गालबोट लावले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा पाणलोट क्षेत्र परिसरात गस्त घालत असताना भगवान भागा अस्वले (वय 29, रा.मुरखेत) ह्याला पकडण्यात आले असून त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीची मारूती सुझुकी बलेनो कार व अंदाजे दहा हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. प्रवीण थोरात यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर मुंबई पोलिस अ‍ॅक्ट 65 (अ) 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *