ब्रिटनमधून परतलेली संगमनेरातील ‘ती’ व्यक्ति पुण्यात ‘क्वॉरंटाईन’! विमानात बसण्यापूर्वी झालेली चाचणी ‘निगेटिव्ह’; प्रशासनाकडून पुन्हा चाचणी करण्याची सूचना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात एकीकडे कोविड बाधितांच्या संख्येत दररोज चढ-उतार दिसत असतांना आता ब्रिटनमधून नव्या विषाणू स्ट्रेनचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने अवघ्या विश्‍वात खळबळ उडाली आहे. जगासह भारतानेही ब्रिटनची हवाई वाहतुक रोखली असून गेल्या 25 नोव्हेंबरनंतर तेथून भारतात परतलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरु करण्यात आला आहे. अशा प्रवाशांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एकूण तेरा प्रवाशांचाही समावेश असून त्यातील अकरा जण अहमदनगरमधील तर प्रत्येकी एकजण संगमनेर व श्रीगोंदे येथील आहेत. संगमनेरातील ‘त्या’ प्रवाशाने ब्रिटनमध्ये केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर स्थानिक प्रशासनाने त्या व्यक्तिचा शोध घेतला असून ती व्यक्ति सध्या पुण्यात गृहविलगीकरणात आहे. गेल्या तेरा दिवसांत त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, मात्र त्यांची पुन्हा एकदा स्राव चाचणी केली जाणार असल्याची माहिती इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली.


ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूंमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत तेथून परतलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. विमानतळ प्राधीकरणाकडून या कालावधीत राज्यात परतलेल्या प्रवाशांची यादी राज्य सरकारला देण्यात आल्यानंतर शासनाने गुरुवारीच (ता.24) त्या त्या जिल्ह्याच्या यंत्रणांना त्याबाबत कळविले होते. त्या यादीनुसार 7 ते 22 डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून अहमदनगर जिल्ह्यात परतलेल्या प्रवाशांची एकूण संख्या तेरा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.


त्यानुसार संगमनेरातील 42 वर्षीय महिला 12 डिसेंबररोजी ब्रिटनमधून भारतात परतली असून विमान प्रवास सुरु करण्यापूर्वी त्यांनी आपली कोविड चाचणी केली होती, मात्र ती नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत संगमनेरचे इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधित महिला ब्रिटनहून परतल्यापासूनच पुण्यात गृहविलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगीतले. संबंधित महिला प्रवाशासोबत प्रशासनाचा संपर्क प्रस्थापित झाला असून गेल्या तेरा दिवसांत त्यांना कोणतीही लक्षणे जाणवलेली नाहीत. मात्र त्यांना पुन्हा एकदा कोविड चाचणी करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.


यासोबतच श्रीगोंद्यातील 26 वर्षीय तरुण 22 डिसेंबररोजी भारतात परतला असून सध्या तो मुंबईत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वरील कालावधीत ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर परतलेल्यांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील कराचीवाला नगर परिसरातील चौघे, मार्केट यार्ड परिसरातील दोघे, गुलमोहोर रस्त्यावरील तिघे तर पाईपलाईन रस्ता व नवनागापूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नगरमध्ये परतलेले प्रवासी वेगवेगळ्या पाच कुटुंबातील आहेत. त्यातील दोघे अद्यापही मुंबईतच असून उर्वरीत नऊजण नगरमध्ये परतले असून प्रशासनाच्या संपर्कात आहेत. या नऊ जणांचे स्राव घेण्यात आले असून आज सायंकाळपर्यंत त्यांचे चाचणी अहवाल प्राप्त होतील.

ब्रिटनमधून परतलेल्या प्रवाशांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाला जनुकीय चाचणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. अशा रुग्णांना कोविड रुग्णांमध्ये न ठेवता त्यांना स्वतंत्रपणे ठेवले जाणार आहे. जिल्ह्यात परतलेल्या एकाही रुग्णाला लक्षणे नसल्याने अजूनपर्यंत चिंतेसारखी स्थिती नाही, मात्र त्यातील एखाद्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यास सहप्रवाशांसह त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल. भारतातील कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असतांना ब्रिटनमधील या नव्या विषाणूंनी जगभरात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण केले आहे. गेल्या 25 नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांनी न घाबरता जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

नव्या विषाणू स्ट्रेनच्या सावटाखाली समोर आले सतरा रुग्ण..!

गुरुवारी (ता.24) संगमनेरात एकूण सतरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील गणेशनगर मधील 47 वर्षीय इसम आणि मालदाड रोडवरील 58 व 36 वर्षीय महिलांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीणभागातील मुधळवाडीतील 40 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 30 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 80 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 54 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगर येथील 50 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगी, अकलापूर येथील 58 वर्षीय इसम, वडगाव लांडगा येथील 35 वर्षीय तरुण व जवळे कडलग येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 5 हजार 897 वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *