शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा गडाखांच्या ताब्यात नवीन विश्वस्त मंडळ जाहीर; ग्रामस्थांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

नायक वृत्तसेवा, नेवासा
जगभर लौकिक असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड बुधवारी (ता.23) जाहीर झाली. विश्वस्त मंडळात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची संख्या जास्त असल्याने हे देवस्थान पुन्हा एकदा गडाखांच्या ताब्यात राहिले आहे. जुन्या घटनेनुसारच निवड करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू परंपरा जपली, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.

धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी आलेल्या एकूण 84 अर्जांमधून पात्र अकरा जणांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये जुन्या विश्वस्त मंडळातील तिघांचा समावेश आहे. यावेळी केवळ एकाच महिलेची विश्वस्त मंडळात वर्णी लागली आहे. बाळासाहेब बन्सी बोरुडे, विकास नानासाहेब बानकर, छबुराव नामदेव भूतकर, पोपट लक्ष्मण कुर्‍हाट, शहाराम रावसाहेब दरंदले, भागवत सोपानराव बानकर, सुनीता विठ्ठल आढाव, दीपक दादासाहेब दरंदले, शिवाजी अण्णासाहेब दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे यांची नियुक्ती झाली आहे.

ग्रामस्थांतून विश्वस्तांच्या निवडीची परंपरा ठाकरे सरकारने कायम जपल्यामुळे शनिशिंगणापूर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मागील भाजप सरकारच्या काळात हे देवस्थान घटना बदलून सरकारच्या अखत्यारित घेण्याचा प्रयत्न होता. आता तो प्रयत्न फसला आहे, असे नमूद करत गावकर्‍यांनी समाधानही व्यक्त केले आहे. नवीन विश्वस्त निवड जाहीर झाल्यानंतर देवस्थानचे मार्गदर्शक जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ‘हे देवस्थान नावारूपाला आणण्यासाठी या गावातील प्रत्येक कुटुंबाचा त्याग आहे. देवस्थानची जुनी परंपरा जपण्यासाठी जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी जी घटना केली व हिंदू धर्माची परंपरा चालू केली होती, ती राखण्याचे मोठे काम मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. पानासनाला प्रकल्पाचा लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रारंभ होणार असून येथील विकासासाठी विविध उद्योजकांशी चर्चा करून सीएसआर फंडातून येथे काम करण्यात येणार आहे.’

धर्मादाय आयुक्तांनी जाहीर केलेल्या व पारदर्शी पद्धतीने नव्या विश्वस्त मंडळाची निवड केल्याबद्दल सर्वच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सर्व ताकदीनिशी देवस्थानचे मार्गदर्शक व नवीन विश्वस्तांच्या पाठीशी राहून त्यांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा नियोजनबद्ध विकास करून जगभरातून शनि दर्शनासाठी येथे येणार्‍या भाविकांना या ठिकाणी मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाने देवस्थानच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह अनेक जिल्ह्यात सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे, अशा भावनाही व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *