धगाडी बाबाजवळ ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला कारची धडक कारचे मोठे नुकसान, चालक गंभीर जखमी; तर एक ट्रॅक्टर पलटी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या जवळ असलेल्या धगाडी बाबा येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव वेगात असणार्‍या कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना आज (बुधवार ता.16) सकाळी घडली आहे. यामध्ये कारचालक गंभीर जखमी असून, कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर एकामागोमाग असणार्‍या ट्रॅक्टरमधील एक ट्रॅक्टर महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातून संगमनेर कारखान्याला ऊस घेऊन येणारे दोन ट्रॅक्टर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन चालले होते. त्याचवेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेला भरधाव वेगाने जाणार्‍या कारने (एमएच.11, बीव्ही.9297) ऊस वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्याचवेळी या ट्रॅक्टरच्या पुढे असणार्‍या ट्रॅक्टरलाही जोराचा धक्का बसल्याने तो थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात कोसळला. या अपघातात कारचालक आतमध्येच अडकून पडला होता. त्यावेळी महामार्गावरुन प्रवास करणार्‍या आणि आजूबाजूला असणार्‍या नागरिकांनी तात्काळ धाव घेत चालकाला कारबाहेर काढले. कारचालक गंभीर जखमी झाल्याने त्यास शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. हा अपघात इतका भयानक होता की कारमधील सुरक्षिततेसाठी असणार्‍या ‘एअर बॅग’ही फुटल्या होत्या. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर पलटी झालेल्या ट्रॅक्टरचे किरकोळ नुकसान झाले आहे.

दळण-वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाट, माहुली एकल घाट, बोटा बाह्यवळण मार्ग यांसह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. परंतु, वाहनचालकांकडून टोल वसूल करुनही महामार्गाची देखभाल होत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबत टोलनाका प्रशासनाला वारंवार विविध संघटना, पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊनही काहीच उपयोग झाला नसल्याचे या अपघातवरुन अधोरेखित होत आहे. आता तरी झोपेचे सोंग घेतलेल्या संबंधित कंपनीने महामार्गाची दुरुस्ती करुन निष्पाप नागरिकांचा जीव वाचवावा, अशी अपेक्षा व्यक्त करुया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *