पोलिसांची भीती झुगारुन कोतूळ परिसरातील अवैध दारु अड्डे राजरोस सुरू! संगमनेरात ‘दबंग’ ठरलेले पोलीस निरीक्षक अभय परमार कर्मचार्‍यांची वतनदारी संपुष्टात आणतील का?

नायक वृत्तसेवा, दमको
मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अकोल्याच्या रिक्त झालेल्या निरीक्षकपदी पूर्वी संगमनेरात ‘दबंग’ कारकीर्द गाजवलेल्या पोलीस निरीक्षक अभय परमार यांची तात्पुरती वर्णी लागली. संगमनेरातील त्यांच्या कार्यशैलीचे ‘गुणगान’ तालुक्यात यापूर्वीच चर्चिले गेल्याने त्यांनी अकोल्याचा पदभार स्वीकारताच अवैध धंदे कडेकोट बंद झाले. मात्र हे आभासी चित्र असल्याचे आता समोर येवू लागले असून वरच्या कमाईला सोकावलेल्या अकोले पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्‍यांनी साहेबांना ‘अंधारात’ ठेवून परस्पर अशा काही व्यावसायिकांना पाठबळ दिल्याचे आता दिसू लागले आहे. आपल्या ‘वतनात’ साहेबांची कारवाई होवू नये त्यासाठी कोतूळ, समशेरपूर अशा तालुक्यापासून अंतरावरील गावांच्या बीट प्रमुखांनीच आता आपल्याच साहेबांवर ‘वॉच’ ठेवायला सुरुवात केल्याने साहेबांच्या मुखी बंद असलेले धंदे मात्र राजरोसपणे सुरू आहेत. संगमनेरातील अशा प्रत्येक धंद्याची नोंद घेणारे परमार अकोल्यातील आपल्याच हाताखालच्या वतनदारांचे रॅकेट उध्वस्त करु शकतील का? असा सवालही आता उपस्थित झाला आहे.

अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील पाडाळणे, वाघापूर, पांगरी, लिंगदेव, सावरचोळ फाटा, खडकी, लहित, चास, कोहणे या परिसरातील अवैध देशी विदेशी दारुविक्री व या बेकायदा उद्योगांना अकोले शहरातील एका दुकानातून मोठ्या प्रमाणात मद्य पुरवठा केला जातो. त्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने गेल्या वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले काही पोलीस कर्मचारी स्वतःला वतनदार समजून परस्पर अशा अवैध उद्योगांना पाठबळ देत आहेत. कोतुळ परिसरातील चित्रही यापेक्षा वेगळे नाही. याच वतनदारीतून गेल्या महिन्यात चक्क पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळेंना बदलीच्या कारवाईचा सामना करावा लागला होता.

कोतूळ पोलिस दूरक्षेत्राच्या अंतर्गत परिसरातील वीस व ब्राम्हणवाडा बीटमधील पंधरा अशी एकूण पस्तीस गावे अंतर्भूत आहेत. याच परिसरातील बोरी ते पिंपळदरी हा परिसर म्हणजे वाळूतस्करांचा इलाका म्हणून तर कोतूळ परिसर संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांना जनावरांची रसद पुरविणारे सर्वात मोठे ठिकाण म्हणूनही कुप्रसिद्ध आहे. त्यासोबतच या भागात एकूण ‘आठ’ ठिकाणी अवैध दारुविक्रीचे अड्डे असल्याने या बीटला वर्णी लागलेला कर्मचारी एकदा का येथे आला की सुखावतो आणि येथेच स्थिरावतो असे सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून कोतूळकर सामान्य नागरिक अनुभवतो आहे. अकोले पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, ज्ञानेश्वर वाखारे, अविनाश शिळीमकर, नंदकुमार शेळके यांनाही या वतनदार पोलीस कर्मचार्‍यांचा फटका सहन करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. या गोंधळात चक्क ठाण्याचे प्रमुख समजले जाणारे अधिकारी बदलीच्या कारवाईला सामोरे गेले, मात्र या कर्मचार्‍यांचे काहीच वाकडे होवू शकले नाही. विशेष म्हणजे अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक जोंधळे यांना जागेही केले होते, मात्र ते देखील या कर्मचार्‍यांचे काहीच करु शकले नाही आणि शेवटी त्यांनाच अकोले सोडून मुख्यालयात जावे लागले.

कोतूळ परिसरात राजरोसपणे उपलब्ध होणार्‍या बेकायदा दारुमागे अकोल्यातील एका ठोक दारु विक्रेत्याचा मोठा हात आहे. त्या विरोधात दोन महिन्यांपूर्वी खुद्द अकोल्याच्या आमदारांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘आत्मक्लेश’ केला होता. मात्र त्याचा कोणताही परिणाम या अवैध दारु धंद्यांवर झाला नाही. मात्र अकोल्यातील दारुबंदी कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी थेट उत्पादन शुल्कमंत्र्यांना फोन केल्यानंतर मात्र पोलिसांनी एका दुकानावर कारवाईचा फार्स केला. याचाच अर्थ मंत्र्यांनी सांगितले तरच कारवाई होते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपोषणालाही इथे दाद मिळत नाही. मग पोलीस निरीक्षकांची काय गणती असा सवाल यानिमित्ताने उभा राहीला आहे.

कोतूळसह समशेरपूर व देवठाण या परिसरातही मोठे अवैध दारुविक्रीचे अड्डे आहेत. कोतूळ, ब्राम्हणवाडा येथील पदभार असलेले कडक शिस्तीचे उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी देखील या कर्मचार्‍यांचा अनुभव घेतला असल्याने ते त्यांच्यापासून दोन हात लांब राहण्याचाच प्रयत्न करताना दिसतात. आतातर संगमनेरात ‘दबंग’ ठरलेले पोलीस निरीक्षक अभय परमार यांची वर्णी अकोल्यात लागली आहे. त्यांच्या कारकीर्दीत ते अकोले तालुक्यातील सामान्य जनता, पतीच्या दारु व्यसनाला वैतागलेल्या महिलांना ‘अभय’ देतात की यापूर्वीच्या निरीक्षकांचाच कित्ता गिरवतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

‘त्या’ कर्मचार्‍यांना नेमकं कोणाचं ‘अभय’?
कोतूळ येथील पोलीस चौकीत गावातील व परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते कधीच जात नाहीत. येथील चौकीच्या आवारातच अनेकदा संगमनेरात धाडण्यासाठी कत्तलीची जनावरे बांधलेली असतात. संगमनेर येथून येणारा एका पक्षाचा कार्यकर्ता व दोन खासगी खबरे यांचा येथे नियमितपणे ‘रात्रीस खेळ चालतो’. तो संगमनेरी कार्यकर्ता वरिष्ठांकडून आशीर्वाद मिळवून देण्याची हमी भरतो. येथील कर्मचार्‍यांच्या विरोधात थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ग्रामसभेचा ठराव व अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सह्यांची निवेदने दिली आहेत. मात्र वरुन चौकशीचे आदेश येताच संगमनेरचा ‘तो’ कार्यकर्ता सगळं काही मॅनेज करतो अशी चर्चा सध्या कोतूळ परिसरातून चर्चिली जात आहे. पो.नि.परमार यांनी वतनदार झालेल्या या कर्मचार्‍यांसह ‘त्या’ कार्यकर्त्याचाही माज मोडण्याची गरज आहे, ते तसं करु शकतील का? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *