संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच! शव्वाशेपैकी अवघ्या बारा शाळा सुरु, विद्यार्थी संख्याही अवघी दिड टक्का..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीपासून सुरु झालेल्या कोविडच्या संक्रमणाचा कहर सुरू असून सुट्टीच्या दिवसांत कमी होणारी रुग्णसंख्या अन्य दिवसांत मात्र सरासरीचा वेग वाढवणारी ठरत आहे. गेल्या तीन दिवसांचा विचार करता तालुक्यात नव्याने 92 रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये व्यापारी, शिक्षक व सामान्य नागरिकांचा समावेश आहे. राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारापर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली, मात्र तत्पूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोविड चाचणी करणं बंधनकारक केले आहे. त्यानुसार तालुक्यातील 125 शाळांमधील शिक्षकांची व कर्मचार्‍यांची चाचणी सुरू असून निम्म्या चाचण्या पूर्ण झाल्याअसून आठ शिक्षक बाधित आढळून आले आहेत. आत्तापर्यंत तालुक्यातील केवळ बारा शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी संख्या अवघी 419 आहे. तर गेल्या तीन दिवसांत तालुक्याने बाधितांचे 51 वे शतक पार करीत 5 हजार 167 रुग्णसंख्या गाठली आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील 9 ते 12 वीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली होती. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार्‍या गुरुजणांची शासकीय प्रयोगशाळेतून कोविड चाचणी करणं अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यानुसार संगमनेरच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील 125 शाळा सुरु करण्यास परवानगी दिली असून त्यातील 1 हजार 891 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची शासकीय प्रयोगशाळेद्वारा चाचणी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. आत्तापर्यंत त्यातील 944 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 8 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

संगमनेर तालुक्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण 125 शिक्षणसंस्था आहेत. त्यातून 31 हजार 205 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र मोठ्या कालावधीनंतर कोविडच्या सावटाखाली शाळा सुरु करण्यास मान्यता देताना शासनाने पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत केवळ 3 हजार 795 (12.16 टक्के) विद्यार्थ्यांनीच संमतीपत्र दाखल केले आहे. आज अखेर एकूण 125 शाळां पैकी केवळ बारा शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थी संख्या अवघी 419 (1.34 टक्के) इतकी नगण्य आहे.

यासोबतच गेल्या तीन दिवसांत तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 92 रुग्णांची भर पडली असून त्यात शहरातील 25 व ग्रामीणभागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. यातील रविवारी (ता.28) 21 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात अनेक दिवसांनंतर शहरातील रुग्णसंख्या ग्रामीण रुग्णसंख्येपेक्षा एकने अधिक आहे. शहरातील नायकवाडपुरा येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण, इंदिरानगरमधील 62 वर्षीय महिलेसह 58 वर्षीय इसम, अभिनव नगरमधील 40 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण व 11 वर्षीय बालिका, देवी गल्लीतील 48 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 52 वर्षीय इसम, शिवाजी नगरमधील 65 वर्षीय महिला व परदेशपुर्‍यातील 34 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शहरातील अकरा जणांसह ग्रामीणभागातूनही दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात घुलेवाडीतील 56 वर्षीय इसम, झरेकाठी येथील 52 वर्षीय इसम, निमगाव बु. येथील 38 वर्षीय तरुण, निमोण येथील 60 वर्षीय महिला, कौठे येथील 65 वर्षीय महिला, आश्वी बु. मधील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, काकडवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पोखरी हवेली येथील 29 वर्षीय तरुण व रायते येथील 38 वर्षीय तरुणाचा स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी तालुक्याच्या रुग्णसंख्येत 21 रुग्णांची भर पडून तालुका 5 हजार 167 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

शनिवारी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..!
शनिवारी (ता.28) शहरातील नऊ जणांसह तालुक्यातील 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील मालदाड रोडवरील 32 वर्षीय तरुण, मार्केट कमिटी परिसरातील 22 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 56 वर्षीय इसम, महानुभाव मंदिर परिसरातील 37 वर्षीय तरुण, अभिनव नगरमधील 70 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला, नायकवाडपुर्‍यातील 77 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, मेनरोडवरील 45 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या 14 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यासोबतच ग्रामीण भागातील खळी येथील 47 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 50 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 34 वर्षीय तरुण, निमगाव खुर्दमधील 42 वर्षीय तरुण, घारगावमधील 72 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, आश्वी बु. मधील 62 व 50 वर्षीय दोन महिला, कोकणगावमधील 38 वर्षीय तरुण, चिंचपूरमधील 72 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 28 वर्षीय तरुण, साकूरमधील 60 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 43 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 43 व 20 वर्षीय महिला, कर्‍हे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मंगळापूरमधील 45 वर्षीय इसम, व सांगवी येथील 34 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला असे एकूण 31 जण संक्रमित झाले आहेत.

शुक्रवारी तालुक्यात आढळले 40 संक्रमित रुग्ण..!
शुक्रवारी (ता.27) तालुक्यातील कोविडचा आलेख उंचावलेलाच राहीला. प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील अवघ्या पाच जणांसह तालुक्यातील 40 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात शहरातील सातपुते रुग्णालयाजवळील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मधुबन वसाहतीतील 79 वर्षीय वयोवृद्ध नागरिक व केवळ संगमनेर असा पत्ता असलेल्या 60 व 40 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीणभागातील केळेवाडी येथील 9 वर्षीय बालिका, पिंपरणे येथील 57 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 36 व 27 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी येथील 24 वर्षीय तरुण, रहाणे मळा येथील 55 व 46 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण.

कासारा दुमाला येथील 60, 40 व 35 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ इसमासह 68 व 43 वर्षीय महिला आणि सात वर्षीय बालक, प्रतापपूर येथील 17 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 68, 50 व 40 वर्षीय महिलेसह 40 व 17 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 37 वर्षीय तरुणासह अमृतनगरमधील 38 वर्षीय तरुण व 38 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 41 वर्षीय तरुण, कोल्वहेवाडी येथील 40 वर्षीय तरुण, मांची हिल येथील 23 वर्षीय तरुण, चिखली येथील 40 वर्षीय तरुण व राजापूरमधील 44 वर्षीय तरुण अशा तीन दिवसांत शहरातील 25 जणांसह एकूण 92 रुग्णांची भर पडल्याने तालुका 51 वे शतक पार करुन 5 हजार 164 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्‍या संगमनेर तालुक्यात इयत्ता 9 ते 12 वीच्या एकूण 125 शाळा/कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्या सर्वांमध्ये मिळून एकूण 31 हजार 205 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी शिक्षणाचे धडे देणार्‍या शिक्षकांसह 1 हजार 891 कर्मचारी कार्यरत असून शासन निर्णया आत्तापर्यंत 944 शिक्षकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील आठ शिक्षकांना संक्रमण झाले आहे. आत्तापर्यंत अवघ्या 3 हजार 795 (12 टक्के) पालकांनीच आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याबाबत संमती दर्शविली असून एकूण शाळांमधील केवळ 12 शाळा (9.6 टक्के) सुरू झाल्या आहेत तर विद्यार्थी संख्याही जेमतेम 419 (1.34 टक्के) इतकी नगण्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *