शिर्डीतून अनेकजण बेपत्ता होत असल्याच्या माहितीने उडाली खळबळ मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे का?; उच्च न्यायालयाचा सवाल

नायक वृत्तसेवा, शिर्डी
जगप्रसिद्ध तीर्थस्थान असणार्‍या साईबाबांच्या शिर्डीला जगभरातील भाविक दररोज लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. मात्र, अत्यंत गर्दी असणार्‍या साईनगरीतून अनेकजण बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये मानवी अवयव तस्करीचे काही रॅकेट आहे की काय? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केल्याने साईभक्त धास्तावले आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशातील इंदोर येथील मनोज सोनी यांची पत्नी दीप्ती सोनी ही शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली आहे. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि स्वतःही अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र अजूनही ती सापडलेली नाही. शिर्डी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनोज सोनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयानेही पोलीस तपासावर ताशेरे ओढले आहे. शिर्डीतून बेपत्ता होणारी माणसे अखेर गेली कुठे? यात मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे की काय? असा सवाल न्यायालयानेही उपस्थित केला आहे.

दरम्यान, शिर्डी पोलिसांनी न्यायालयात बेपत्ता झालेल्या महिला-पुरूषांची यादी सादर केली आहे. यात 3 वर्षातीलच बेपत्ता व्यक्तींचा आकडा थक्क करणारा आहे. गेल्या 3 वर्षांत 279 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यातील 67 जणांचा अजूनही तपास लागलेला नाही. अनेकजण तक्रार दाखल करतात, मात्र हरवलेली व्यक्ती घरी पोहोचल्यानंतरही पोलिसांना कळवत नसल्याचे तपासी अधिकारी दीपक गंधाले यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांतील संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयाने मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की, मानवी तस्करीबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे, अशी माहितीही दीपक गंधाले यांनी दिली.


शिर्डीत दररोज लाखो साईभक्त साई दर्शनासाठी येतात. त्यापैकी अनेकजण बेपत्ता होत आहेत. परराज्यातील महिला आणि अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत अखेर ही माणसे गेली कुठे? ती घरी परतणार की नाही? किती दिवस घरचे शोधाशोध करणार? यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? हे आता स्पष्ट होणे गरजेचे आहे.

वर्ष       बेपत्ता       अद्यापही बेपत्ता
2017     71             20
2018    82             13
2019    88             14
2020   38             20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *