अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे! मोरेवाडी परिसरातील नागरिक करताहेत जीव मुठीत धरून प्रवास

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर गावांतर्गत असलेल्या खैरदरा येथे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करताता. त्यानंतर मोरेवाडी-नांदूर मार्गे ही वाहने धावत असल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने मोरेवाडी ते नांदूर हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीमुळे येथील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. जड वाहनांमुळे रस्त्यावरील संपूर्ण खडी निघून गेली असल्याने पाणी जाणार्‍यांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता खैरदरा परिसरातील आदिवासी बांधवांसाठी मुख्य रहदारीचा असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी वेळेत नेणेही यामुळे कठीत होत आहे. यापूर्वी दिवाळीला पाहुणे घरी येणार म्हणून मोरेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्त्यावर मुरूम टाकून वाळू वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे.

दरम्यान, खैरदरा येथील मुळा नदीपात्रासह धडीतून मोठ्या प्रमाणात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असतानाही महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोरेवाडी-नांदूर रस्त्याबरोबरच नांदूर ते बावपठार रस्त्याची देखील अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर गुडघ्याला लागेल एवढा गाळ होता. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन कारभाराला वैतागलेल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्त्याचे काम केले आहे. परंतु, वर्षानुवर्षांपासून पठारभागाच्या नशिबी हालअपेष्टाच असल्याचे यावरुन अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *