गणेशोत्सवाच्या उत्साहावर रुग्णवाढीने विरजण..! वडगल्ली व प्रवरा परिसरातही कोविड विषाणूंचा प्रवेश

वडगल्ली व प्रवरा परिसरातही कोविड विषाणूंचा प्रवेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर तालुक्यात आजही रुग्ण सापडण्याची शृंखला अबाधित राहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सार्वजनिक उत्सवांवर प्रतिबंध घालण्यात आलेले असल्याने आपल्या उत्साहाला मुरड घालून घरातच गणपती बाप्पा मोरया म्हणत घरगुती गणपतीच्या आगमनाने आनंदित झालेल्या संगमनेरकरांना सायंकाळी धक्का बसला आहे. खासगी प्रयोगशाळा व रॅपिड एंटीजन चाचणीतून आजही तालुक्याच्या रुग्ण संख्येत तब्बल 30 रुग्णांची भर पडली, त्यामुळे तालुक्याच्या रुग्ण संख्येने आज 1 हजार 353 चा टप्पा गाठला.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने संगमनेरकरांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने संगमनेरकराना काहीसा दिलासा मिळाला होता. कालही गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला संगमनेर तालुक्यात पंधरा रुग्ण सापडल्याने नेहमीच्या सरासरीपेक्षा संख्या घटल्याने काहीसे दिलासादायक वातावरण होते. मात्र आज ते पूर्णतः बाजूला सारून शहरात 12 तर तालुक्यात अठरा असे एकूण 30 रुग्ण समोर आले आहेत.

आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील अनेक नवीन भागांमध्ये कोविडचा प्रवेश झाला आहे. त्यात प्रवरा परिसरातील संतोषी माता मंदिराच्या परिसरातील 28 वर्षीय तरुण, बाजारपेठे लगतच्या वड गल्ली परिसरातील 47 वर्षीय तरुण, देवाचा मळा भागातील 32 वर्षीय तरुण, जनता नगर परिसरातील 42 वर्षीय महिला, इंदिरानगर मधील तीस वर्षीय तरुण, घोडेकर मळा परिसरातील काल आढळलेल्या दांपत्याची 5 व दोन वर्षीय दोन्ही मुले यांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.

त्यासोबतच शहरातील अभिनव नगर येथील 27 वर्षीय महिला, खंडोबा गल्ली परिसरातील 50 वर्षीय इसम, कुरण रोड भागातील 72 वर्षीय पुरुष, विद्यानगर परिसरातील 64 वर्षीय इसम, कुंभार आळा परिसरातील 31 वर्षीय तरुण शहरातील अशा एकूण बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातून शहरातील वड गल्ली व संतोषी माता मंदिर परिसरात पहिल्यांदाच कोविड रुग्ण आढळले आहेत.

शहरासोबतच तालुक्यातील रुग्ण संख्येतही आज तब्बल अठरा रुग्णांची भर पडली आहे. त्यात एकट्या घुलेवाडीतून सात रुग्ण समोर आले आहेत. तेथील 75 वर्षीय महिला व 75 वर्षीय इसमासह 58 वर्षीय पुरुष, 24, 18 वर्षीय तरुण, 46 व तीस वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथून 55 वर्षीय व 42 वर्षीय इसम, पिंपळे येथील 41 वर्षीय तरुण, शिबलापुर येथील 42 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 62 वर्षीय इसम, चिकणी येथील 45 वर्षीय तरुण, सोनोशी येथील 54 वर्षीय इसम, चितळवेढे येथील तीस वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील तीस वर्षीय तरुण, खांबा येथील 27 वर्षीय तरुण व मनोली येथील 59 वर्षीय इसम आदी अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रूग्ण संख्येत सलग मोठी वाढ होताना तालुक्याची रुग्णसंख्या 1 हजार 353 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्ण संख्येने ओलांडला १३ हजारांचा टप्पा..

  • आज ४४५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.०८ टक्के
  • आज नव्या ६०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.०८ टक्के इतके झाले आहे. 

जिल्ह्यातील ४४५ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, अहमदनगर मनपा १८४, संगमनेर ३७, राहाता १७, पाथर्डी १७, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा २४, श्रीगोंदा ११, पारनेर २०, अकोले १६, राहुरी ०७, शेवगाव २१, कोपरगाव २४, जामखेड १३, कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या : १३ हजार ५४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : ३ हजार २२८
  • मृत्यू : २२६
  • एकूण रूग्ण संख्या : १६ हजार ५०८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *