‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेने कोपरगावकरांना नयनरम्य रांगोळ्यांचे दर्शन

‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेने कोपरगावकरांना नयनरम्य रांगोळ्यांचे दर्शन
‘सूर्यतेज’सह विविध संघटनांच्या सलग आठव्या वर्षीच्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील सूर्यतेज संस्थेच्यावतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा, बाल रंगभूमी परिषद, कोपरगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन, कलाध्यापक संघटना यांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन सहभागी स्पर्धकाच्या घरासमोरील अंगणात सोमवारी (ता.16) सूर्योदयापासून ते सकाळी 9.30 पर्यंत करण्यात आले होते. यात दर्जेदार व नयनरम्य रांगोळी साकारून सलग आठव्या वर्षी कोपरगावकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम घरापुढे रांगोळी काढण्याची भारत वर्षात मोठी परंपरा आहे. 64 कला प्रकारांमध्ये रांगोळी कलेला महत्व आहे. सूर्यतेज संस्थेचा कोपरगाव फेस्टिवल अंतर्गत घर तेथे रांगोळी हा उत्सव सर्व समावेशक करण्यासाठी बंदिस्त हॉल, रांगोळीचा ठराविक आकार, रंग-संगती याचे बंधन न ठेवता या स्पर्धेसाठी पारंपारिक, निसर्गचित्र, व्यक्तीचित्र, सामाजिक विषय, व्यंग्यचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत विविध प्रकारात कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या. प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी स्पर्धकाच्या प्रत्येक ठिकाणी कलेचे पदवीधर परीक्षण सहाय्यक, छायाचित्रकार, नोंदणी अधिकारी, संस्थेचे प्रतिनिधी, निरीक्षक, गाईड अशी ऑनलाइन 15 पथके तयार करून त्याचा प्राथमिक अहवाल तयार करून व छायाचित्र हे सर्व परीक्षण संदर्भात अंतिम निर्णयासाठी कलेच्या उच्च पदवीधर समितीकडे सुपूर्द करून त्याचा अंतिम निकाल प्रसार माध्यमांद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समिती प्रमुख कल्पना गिते यांनी दिली.

प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेनिमित्त कोपरगावातील छोट्या-छोट्या रांगोळी विक्रेत्यांची मोठी विक्री झाली. नियोजन आणि व्यवस्थापनशास्त्र मध्येही रांगोळी स्पर्धा महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट समजली जाते. कोपरगावातील रांगोळी कलेत छोट्या-छोट्या कलाकारांमध्ये दडलेले पैलू यानिमित्त पहावयास मिळाले. ठिपके, संस्कार भारती, प्रबोधन, विविध निसर्ग व मानव निर्मित वस्तूंचा वापर करून तयार केलेली रांगोळी आणि कृष्णधवल रंगसंगतीपासून सप्तरंगांची मुक्त उधळण केलेली रांगोळीमुळे रांगोळी स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. स्पर्धेचा शुभारंभ सूर्यतेजच्या प्रा.मसुदा दारूवाला यांनी संकटकाळी प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार योगेश चंद्रे यांची मामलेदार या पदवीची व्यक्तीरेखा विशेष प्रदर्शनार्थी साकारुन त्यांचा कार्यगौरव केला आहे.

या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असल्याने गरीब, सर्व सामन्यांच्या दारापासून ते बंगल्याच्या गच्चीपर्यंत सर्व स्तरावरचा सहभाग हा स्पर्धेचा मानबिंदू ठरला. या स्पर्धेत मुली-महिलांसह तरुण पुरुषांनीही लक्षणीय सहभाग घेतला. दिवसेंदिवस लोप पावत चाललेले सण-उत्सव-परंपरा उर्जित ठेवण्यासाठी सूर्यतेज संस्थेनेे घर तेथे रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, प्रा.लता भामरे, प्रा.रश्मी जोशी, अ‍ॅड.सीमा जोशी, प्रा.पल्लवी वदक (रुईकर), प्रा.अनिल अमृतकर, डॉ.नीलिमा आव्हाड, प्रा.पायल देवळालीकर, प्रा.ज्योती कोताडे, सुरेखा चिंचपुरे, सुरेखा आव्हाड, सीमा भिडे, प्रा.समीना बेग, प्रा.तेजल पगारे, प्रा.माधवी पेटकर, गीता बंब, प्रा.दर्शना हलवाई, प्रा.ऐश्वर्या बिडवे, प्रा.वंदना अलई, मनीषा धनवटे, प्रा.कविता बडोगे, पल्लवी भगत, कोमल गोडसे, जयश्री मोराणकर, प्रा.अमोल निर्मळ, प्रा.मानसी टिळेकर, बंडूनाना चिंचपुरे, महेश थोरात, रवींद्र भगत, अ‍ॅड.महेश भिडे, प्रा.अतुल कोताडे, प्रा.मतीन दारुवाला, चंद्रकांत चोपडे, दीपक येवले, मिलिंद जोशी, कल्पेश टोरपे, अमोल पवार यांसह सूर्यतेज संस्थेचे सदस्य, कलाध्यापक संघटना, नाट्य परिषद, कलाप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *