वादग्रस्त पोलीस निरीक्षक सुनील पाटील मुख्यालयातच..! संगमनेर शहर अनुभवलेले निरीक्षक पांडूरंग पवार तालुका पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध कारणांवरुन सतत चर्चेत राहीलेले आणि कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या क्षणातही वादग्रस्त ठरलेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे मुख्यालयात रवानगी झाली आहे. त्यांच्याजागी पूर्वाश्रमीचे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक व सध्या पोलीस अधीक्षकांच्या वाचकाची भूमिका बजावणार्‍या पांडूरंग पवार यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे पो.नि.पवार अगदी सुरुवातीपासून शहर पोलीस ठाण्यासाठी आग्रही होते, मात्र आता त्यांची ‘फायनल पोस्टिंग’ झाल्याने शहरासाठी इच्छुक असलेला आणखी एक स्पर्धक कमी झाला आहे.


तालुक्यातील 71 गावांसह सुमारे दोन लाखांच्या लोकवस्तीचा पसारा असलेल्या संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक घडामोडी घडत असतात. पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी या महामार्गामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने तालुका पोलिस सतत व्यस्त राहतात. अशा पोलीस ठाण्याचे निरीक्षक असलेल्या सुनील पाटील यांनी आपल्या कार्यकाळात काही चांगल्या गोष्टीही घडवून आणल्या. मात्र कर्मचार्‍यांशी त्यांचे वागणे-बोलणे, माध्यमांशी सतत अंतर ठेवण्याची वृत्ती, गुन्हाची माहिती लपविण्याची सवय आणि प्रत्येक गुन्हात हित पाहण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या चांगल्या कामांपेक्षा ते या गोष्टींमुळेच तालुक्यातील संपूर्ण कारकीर्दीत चर्चेत राहीले.


एका आंतरजातीय विवाहाच्या प्रकरणातही त्यांनी नाहक हात घातला, आणि याच प्रकरणाने त्यांचा घात केला. कर्‍हे येथील भिन्न जातीच्या जोडप्याने गावातून पळून जात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी ‘मिसींग’ नोंद करीत तपासाला सुरुवातही केली होती. त्या दरम्यानच ते जोडपे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी कायदेशीर मार्गाने विवाह केल्याची कागदपत्रे सादर केली. त्यानुसार पो.नि.पाटील यांनी त्या दोघांनाही सहीसलामत सोडून देण्यासोबतच आवश्यकतेनुसार त्यांना संरक्षण देणे अभिप्रेत होते.


मात्र आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मुलीकडील मंडळींच्या ‘दबावातून’ त्यांनी रितसर असूनही प्रेमविवाह करणार्‍या संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यातच बसवून मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध पालकांसोबत घरी जाण्याचे फर्मान सोडले. हे नाट्य मागील शुक्रवारी (ता.30) मध्यरात्रीपर्यंत तालुका पोलीस ठाण्यात सुरु होते. ही गोष्ट न रुचल्याने ‘त्या’ प्रेमवीराने थेट राज्याच्या राजकारणात ‘दादा’ समजल्या जाणार्‍या आपल्या नेत्याला थेट फोन लावला आणि पो.नि.पाटील यांची संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील बहुतेक ‘वादग्रस्त’ ठरलेली कारकीर्द संपुष्टात आली.


‘त्या’ तरुणाच्या फोननंतर ‘दादांनी’ थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून संबंधित प्रकरणी तालुका पोलीस निरीक्षकांकडून कायदा मोडून मनमानी सुरु असल्याची तक्रार केली गेल्याने राज्याच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच अगदी मध्यरात्री बदलीचा आदेश निघाला आणि तात्काळ पो.नि.पाटील यांना पदभार सोडून तो शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे सोपविण्यास सांगण्यात आले. अर्थात दुसर्‍या दिवशी संगमनेर तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या पोलीस अधीक्षकांनी नूतन अधिकार्‍याची नियुक्ती होईस्तोवर पाटील यांना थांबण्यास सांगीतल्याने त्यांना एका आठवड्याचा ‘बोनस’ मिळाला.


बरोबर आठ दिवसांनी काल शुक्रवारी (ता.6) जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांचे वाचक म्हणून जबाबदारी असलेल्या पांडूरंग पवार यांना संगमनेर तालुका तर नियंत्रण कक्षातील महिला पोलीस निरीक्षक ज्योति गडकरी यांना आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविली. त्यासोबतच जिल्ह्याबाहेरुन बदलून आलेल्या घनश्याम बळप यांना पारनेर तर महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांना जिल्ह्याच्या भरोसा सेलची जबाबदारी सोपविण्यात आली. याच आदेशात पो.नि.पाटील यांची 30 ऑक्टोबररोजी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली, मात्र ते अद्याप हजर झाले नसल्याने पो.नि.पवार यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार घेवून पो.नि.पाटील यांना पदमुक्त करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार पो.नि.पवार आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारणार असल्याचे समजते.


बहुधा राज्यातील पोलीस दलाच्या इतिहासात एखाद्या ‘प्रेम विवाहाच्या’ प्रकरणात एखाद्या पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली होणे व त्याचे आदेशही मध्यरात्रीच्या सुमारास निघण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे. पो.नि.पाटील यांची तालुका पोलीस ठाण्यातील कारकीर्द काही प्रकरणांवरुन वादग्रस्त ठरली असली तरीही त्यांनी आपल्या येथील कार्यकाळात अनेक चांगली कामेही केली आहेत. मात्र म्हणतात ना, दहा चांगल्या कामांच्या चकाकीला एकच वाईट काम झाकोळून टाकते त्याप्रमाणे देवगावमध्ये झालेल्या वाळु तस्करांच्या अपघाताचे निमित्त झाले आणि त्यांची येथील संपूर्ण कारकीर्दच वादग्रस्त म्हणून गणली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *