डाळिंब उत्पादकाची पंधरा लाखाची फसवणूक; व्यापार्‍याविरोधात गुन्हा

डाळिंब उत्पादकाची पंधरा लाखाची फसवणूक; व्यापार्‍याविरोधात गुन्हा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शेतकर्‍याकडून तब्बल 15 लाख 72 हजार रुपयांचे डाळिंब घेऊन त्याचे पैसे न देता त्याची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकबर अल्लाउद्दीन तांबोळी (रा.पिंपळगाव केतकी रोड, ता.दिंडोरी, नाशिक) याच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.2) उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेतकरी विजय ढौकचौळे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

शेतकरी विजय ढौकचौळे व इतर शेतकर्‍यांकडून आरोपी अकबर तांबोळी याने नोव्हेंबर 2018 ते 2 नोव्हेंबर, 2020 या काळात वेळोवेळी 15 लाख 72 हजार 765 रुपयांच्या डाळिंबाची खरेदी केली. त्याबद्दल्यात आरोपीने शेतकर्‍यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी’ या बँकेचे धनादेश दिले. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी आरोपीला संपर्क केला. तसेच आरोपीच्या घरी जाऊन त्याला डाळिंबाच्या पैशांची मागणी केली. परंतु आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच नंतर मोबाइल बंद करून आरोपी पळून गेला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच शेतकरी विजय ढौकचौळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *