संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 43 वे शतक..! शहरातील सहा जणांसह एकूण रुग्णसंख्येत सतरा जणांची नव्याने भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

महिनाभर दिलासा देणाऱ्या ऑक्टोबरने कालच्या शनिवारी 64 रुग्णांचा धक्का दिल्यानंतर तालुक्याला आज काहीसे समाधान मिळाले आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा सहा तर खासगी प्रयोगशाळे द्वारा अकरा जणांच्या अहवालातून शहरातील सहा जणांसह तालुक्यातील एकूण 17 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याने बाधितांचे 43 वे शतक ओलांडीत 4 हजार 307 रुग्णसंख्या गाठली आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला 50 च्या आसपास रुग्णगतीने तालुक्यात बाधितांची भर पडत होती. मात्र नंतरच्या काळात त्यात सातत्याने घट होऊन ती टप्प्याटप्प्याने प्रति दिवस बत्तीस रुग्णसंख्ये संख्येवर आल्याने तालुका वासियांना मोठे समाधान लाभले होते. त्यातच शहरातून जवळपास कोविडचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आल्याने शहरवासियांनाही हायसे झाले होते. महिनाभर दररोज दिलासा देणाऱ्या रुग्ण संख्येच्या आकड्यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवशी मात्र तालुक्याला दे धक्का करीत तब्बल 64 रुग्णांची भर घातली. यातील 60 रुग्ण एकट्या ग्रामीण भागातील होते हे विशेष.

आजही प्राप्त झालेल्या एकूण 17 अहवालांं पैकी सहा अहवाल संगमनेर शहरातील तर 11 ग्रामीण भागातील आहेत. संगमनेर शहरातील कुरणरोड परिसरात राहणाऱ्या 62 वर्षीय इसमासह स्वामी समर्थ नगर परिसरातील 48 वर्षीय महिला, विद्यानगर परिसरातील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, भारत नगर परिसरातील 55 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 64 वर्षीय व महात्मा फुले नगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. 

ग्रामीण भागात शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरातून 56 वर्षीय इसमासह 20 वर्षीय तरुण, 40 व 21 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथील 65 वर्षीय महिला, जोर्वे येथील 42 व 31 वर्षीय तरुणांसह 38 वर्षीय महिला, कनोली येथील 35 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 29 वर्षीय तरुण व डिग्रस येथील 48 वर्षीय इसमाला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालातून एकूण रुग्ण संख्येत सतरा जणांची नव्याने भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 43 वे शतक ओलांडून 4 हजार 307 वर पोहोचली आहे.

ऑक्टोबरमध्ये पहिल्या 30 दिवसात शहर आणि तालुक्यातील रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याने व त्यातच संक्रमित झालेले रुग्ण उपचारार्थ दाखल झाल्यानंतर बरे होऊन घरी परतण्याची सरासरी ही वाढत गेल्याने तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी सुमारे 96 टक्‍क्‍यांवर गेली होती. मात्र गेल्या काही दिवसात ग्रामीण संक्रमणात पुन्हा काहीशी वाढ झाल्याने व बाधित आढळणाऱ्या व्यक्तींमध्ये वयोवृद्ध व्यक्तींचा अधिक भरणा असल्याने बरे होण्याच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 94 टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. आज शहरी रुग्णसंख्येत सहा रुग्णांची भर पडल्याने शहरातील आजवरची एकूण रुग्णसंख्या 1 हजार 188 वर तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत अकरा रुग्णांची भर पडून ती 3 हजार 119 वर पोहोचली आहे. तालुक्यातील मृत्युदरात मात्र कमालीची घट झाली असून आजच्या स्थितीत तालुक्याचा मृत्युदर अवघा 0.93 टक्क्यांवर आहे, ही तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *