यशवंतराव गडाखांचे आदर्श काम भावी पिढीला कळावे म्हणून नामकरण ः जावळे

यशवंतराव गडाखांचे आदर्श काम भावी पिढीला कळावे म्हणून नामकरण ः जावळे
नेवासा पंचायत समितीचे ‘ज्येष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख’ भवन नामकरण
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील वैभवात भर घालणार्‍या नेवासा पंचायत समितीच्या सुसज्ज इमारतीला ज्येष्ठ साहित्यिक मा.खा.यशवंतरावजी गडाख भवन असे नामकरण करण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी पाठिंबा देऊन सर्वानुमते ठरावाद्वारे घेतला. मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पंचायत समिती आदर्श काम करत असून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या आधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून केलेले आदर्श काम भावी पिढीला कळावे म्हणून नामकरण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले.

नेवासा पंचायत समितीच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यमान सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य कारभारी डफळ यावेळी उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. माजी सभापती कारभारी जावळे यांच्या संकल्पनेतून झालेल्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी नेवासा पंचायत समिती इमारतीला ज्येष्ठ साहित्यिक मा.खा.यशवंतरावजी गडाख भवन असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंचायत समिती सदस्या मीनाक्षी सोनवणे यांनी केलेल्या सूचनेनुसार व सविता झगरे यांनी दिलेल्या अनुमोदनामुळे घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रवेशद्वाराच्या पायरीवर सर्व पंचायत समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत माजी सभापती कारभारी जावळे, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, माजी सभापती कल्पना पंडित, राजनंदिनी मंडलिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नामकरणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सभापती कांगुणे म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात व राज्यात धडाडीने काम केले आहे. कारखाना, सहकारी संस्था, शिक्षण संस्था, बँका उभारून शेतकर्‍यांना स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या कार्याचे उतराई म्हणून सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन एकमुखाने नामकरणासाठी पाठिंबा देऊन ठराव केला व उपस्थिती ही दाखवली त्याबद्दल सर्व सदस्यांना त्यांनी धन्यवाद दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, संजय खरे, पार्वती जावळे, वैशाली एडके, सविता झगरे, विक्रम चौधरी, दादासाहेब एडके, कैलास झगरे, अभियंता आशुतोष नवले उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *