नेवासा प्रशासनाच्या आश्वासनामुळे जोशाबा संघाचे आंदोलन स्थगित

नेवासा प्रशासनाच्या आश्वासनामुळे जोशाबा संघाचे आंदोलन स्थगित
नायक वृत्तसेवा, नेवासा
हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी करून शेतकर्‍यांची लूट करणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करावी. या मुख्य मागणीसाठी आज गुरुवार (ता.29) सकाळी 11 वाजता जोशाबा सेवा संघाच्यावतीने लोटांगण आंदोलन करण्यात येणार होते. मात्र तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या विनंतीला मान देत चर्चेद्वारे सर्व प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. तसेच कापूस खरेदी केंद्रांवर काटा मारल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याने जोशाबा सेवा संघाच्यावतीने होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले.

घोषणाबाजी न करता जोशाबा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते हे नेवासा तहसील कचेरीवर आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व जोशाबा सेवा संघाचे राज्याध्यक्ष देवराम सरोदे व बहुजन समाजाचे युवा नेते सुनील वाघमारे यांनी केले. याप्रसंगी गोरख शेरे, दादाराम आघम, बाबासाहेब शेलार, विकास काळे, नामदेव आवारे, विकास काळे, संपत काळे, अनिल घुले, राजू भूमकर, शिवाजी पांढरे, अंकुश आगळे, शंकर राव, विठ्ठल आगळे, प्रल्हाद शेरे, गोविंद सरोदे उपस्थित होते.

अनेक व्यापार्‍यांनी कापूस खरेदी केंद्रे स्थापन केली असून हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी करून हे व्यापारी ऐन सणासुदीच्या काळात शेतकर्‍यांची दिवसाढवळ्या लूट करत आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या मेहनतीने उत्पादित केलेल्या पांढर्‍या सोन्याची कवडीमोल भावाने विक्री केली जात आहे. ठिकठिकाणी कापूस खरेदी केंद्रे निर्माण करून शेतकर्‍यांची लूट करणार्‍या ‘त्या’ व्यापार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी राज्याध्यक्ष सरोदे यांनी केली. तसेच तालुक्यातील खामगाव येथील ग्रामपंचायतचे खामगाव, खामगाव नंबर 2, खामगाव नंबर 3 असे विभाजन करण्यात येऊन स्वतंत्र ग्रामपंचायतींची निर्मिती करावी, चिकणी खामगाव येथे स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी अशाही मागण्या केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *